Trisha Krishnan Politics: तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर राजकारणातील संभाव्य प्रवेशामुळे ती चर्चेत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत तिचे नाव जोडले जात असतानाच, आता त्रिशाच्या त्रिशा लवकरच राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोमवारी (२३ नोव्हेंबर) तिरुनेलवेली येथे काही समर्थकांनी 'यंग रिव्होल्युशनरी लीडर त्रिशा फोरम' (Young Revolutionary Leader Trisha Forum) नावाची संघटना सुरू केली. या संघटनेची पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पोस्टरवर त्रिशा हिरव्या रंगाची साडी नेसून हात जोडून उभी असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या संघटनेच्या बोधचिन्हातही हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. हा रंग तमिळनाडूतील एआयएडीएमके (AIADMK) या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या पोस्टरची अधिक चर्चा होत आहे. या पक्षाचे नेतृत्व यापूर्वी दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी केले होते.
त्रिशाने राजकारणात प्रवेश करून त्यांच्यासोबत काम करावे, अशी समर्थकांची इच्छा आहे. याच उद्देशाने त्यांनी या फोरमची स्थापना केल्याचे सांगितले आहे. केवळ सत्तेतील पदे मिळवणे हा या संघटनेचा उद्देश नसून तमिळनाडूमधील सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढा देणे हे त्यांचे ध्येय असल्याचे समर्थकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्रिशा कृष्णनने अद्याप या संघटनेबाबत किंवा राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या एकत्र उपस्थितीचीही चर्चा होत आहे. निवडणूक प्रचाराच्या काळापासून विविध कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच वाय. एस. अनिल रेड्डी यांची मुलगी श्रेया आणि उज्ज्वल यांच्या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनमध्येही दोघे उपस्थित होते. याशिवाय, युनायटेड किंगडममध्ये अभिनेता अजित कुमार सहभागी असलेल्या रेसिंग स्पर्धेदरम्यानही ते एकत्र दिसले होते. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्रिशा पहिल्या रांगेत बसलेली दिसली होती. यामुळे राजकीय वर्तुळातही तिच्या उपस्थितीची चर्चा पूर्वीपासूनच रंगली होती.