

कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. हा प्रकरणाची स्टोरी एका क्राईम थ्रिलर सिनेमाच्या कथेलाही मागे टाकेल. सुरुवातीला ही घटना एखादा अपघात आणि त्यानंतर झालेला नैसर्गिक मृत्यू अशी वाटत होती. मात्र पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनंतर सर्वांनाच धक्का बसलाय. एका माजी सैनिकाचा रुग्णालयातच पत्नी आणि तिच्या प्रियकराने कट रचून खून केल्याचा आरोप असून तब्बल 2 कोटी रुपयांच्या इन्शुरन्स रकमेसाठी हा संपूर्ण डाव आखल्याचा पोलिसांचा दावा आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी तिचा कथित प्रियकर, रुग्णालयातील कर्मचारी, प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसह एकूण नऊ जणांना अटक केलीये.
मृत व्यक्तीचे नाव संदीप मांजरगी असं असून ते माजी सैनिक होते. 13 मार्च रोजी त्यांची बाईक घसरल्याने किरकोळ अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना प्रथम हुक्केरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पत्नी सुमा मांजरगी हिने त्यांना घाटप्रभाच्या जेजी रुग्णालयात त्यांना दाखल केलं.
अपघातात गंभीर दुखापत नसतानाही 15 मार्च रोजी संदीप यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात करण्यात आलेल्या नोंदीनुसार, मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असं नमूद करण्यात आलंय. शवविच्छेदनासाठी मृतदेह बीआयएमएस रुग्णालयात पाठवण्यात आला. सुरुवातीच्या फॉरेन्सिक अहवालातही कोणतंही विष आढळलं नसल्याचं नमूद करण्यात आलंय आणि मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगण्यात आलं.
सुरुवातीला हे प्रकरण नैसर्गिक मृत्यू म्हणून पाहिलं जात होतं. मात्र संदीप यांना गंभीर दुखापत नव्हती आणि ते हेल्दी असल्याने तपास अधिकाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. याच दरम्यान एक सोशल मीडिया पोस्ट पोलिसांच्या नजरेत आली. संदीप यांच्या पत्नीचा कथित प्रियकर पुंडलिक डोंबार याने सोशल मीडियावर एक स्टेटस टाकले होते. यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला .
त्यानंतर पोलिसांनी पुंडलिकला चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान त्याने कथित कटाबाबत महत्त्वाची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पुंडलिक डोंबार आणि संदीप मांजरगी यांची ओळख झाली होती. दोघांनी मिळून हॉटेल व्यवसायही सुरू केला होता. याच काळात सुमा आणि पुंडलिक यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपासादरम्यान संदीप यांच्या नावावर तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून जवळपास 2 कोटी रुपयांचे इन्शुरन्स घेतल्याचं समोर आलं. विम्याची रक्कम मिळवण्यासाठीच हा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप जेजी रुग्णालयात उपचार घेत असताना काही रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही या कटात सहभागी करण्यात आलं. तपासात असं समोर आलंय की, सुमा आणि पुंडलिक यांनी सलाईनच्या बाटलीतून विष दिलं. याशिवाय त्यांना झोपेच्या गोळ्याही देण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
खून केल्यानंतर संपूर्ण प्रकरण नैसर्गिक मृत्यूसारखं दिसावं यासाठी मोठ्या प्रमाणात पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला. मोडिकल रिपोर्ट आणि फॉरेन्सिक नोंदींमध्ये फेरफार करण्यात आल्याचा संशय आहे. रुग्णालय कर्मचारी, प्रयोगशाळेतील कर्मचारी तसंच काही सरकारी अधिकाऱ्यांनीही या प्रक्रियेत मदत केल्याचं तपासात समोर आलंय.
याशिवाय रुग्णालयात दाखल करण्यापासून विष मिळवण्यापर्यंत आणि फॉरेन्सिक पुरावे बदलण्यापर्यंत मोठं जाळं काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. फॉरेन्सिक तपासावर प्रभाव टाकण्यासाठी आणि अधिकृत अहवालात बदल करण्यासाठी 3 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालांमध्ये विषाचा उल्लेख येऊ नये यासाठी काही फॉरेन्सिक कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयित विषाच्या बाटल्या, सिरिंज, मोबाईल फोन आणि इतर अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत. त्याचप्रमाणे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुमा मांजरगी, पुंडलिक डोंबार, आरएमपी डॉक्टर बसवराज भासमे, एफडीए अधिकारी अशोक गुजनाळ, एफएसएल लिपिक अप्पासाहेब नाईक, प्रयोगशाळा सहाय्यक चन्नय्या अडिविस्वामीमठ, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पी.एन. नागराज तसेच पुंडलिकचे सहकारी सचिन सेलार आणि राहुल जोगी यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.