

भारतीय चलन व्यवस्थेमध्ये आता महत्त्वाचा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) १ एप्रिल २०२७ पासून १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक म्हणजेच पॉलीमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्ही मूल्यांच्या प्रत्येकी १०० कोटी नोटा छापल्या जाणार असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे, या नव्या नोटांचा आकार सध्याच्या कागदी नोटांप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, RBI या प्रकल्पांतर्गत १० रुपयांच्या १०० कोटी आणि २० रुपयांच्या १०० कोटी पॉलीमर नोटा बाजारात आणून त्यांची चाचणी करणार आहे. हा फक्त प्रोयोगिक प्रकल्प (फिल्ड ट्रायल) असेल. त्यामुळे सुरुवातीला या नोटा मर्यादित स्वरुपात चलनात आणल्या जातील.
नोटांचा आकार बदलणार नसल्यामुळे बँकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण नव्या नोटांसाठी एटीएम मशीन परत कॉन्फिगर करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बँकांचा जास्तीचा खर्च वाचायला मदत होईल.
१० आणि २० रुपयांच्या नोटांचा वापर बाजारपेठेत सर्वात जास्त होतो. भाजीपाला खरेदी, बस - रिक्षाचं भाडं आणि किरकोळ व्यवहारांमध्ये या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सततच्या वापरामुळे कागदी नोटा लवकर फाटतात, खराब होतात किंवा भिजून निरुपयोगी ठरतात. त्यामुळे RBI ला वारंवार नव्या नोटा छापाव्या लागतात.
पॉलीमर नोटा पण जास्त टिकाऊ असतात. त्या पाणीरोधक आणि मळ प्रतिरोधक असल्यामुळे सहज खराब होत नाहीत. सामान्य कागदी नोटांच्या तुलनेत त्यांचे आयुष्य तीन ते चार पट जास्त असू शकते. त्यामुळे भविष्यात नोटांच्या छपाईवरचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.
नव्या प्लास्टिक नोटांच्या चाचणीमुळे सध्याच्या १० आणि २० रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. जुन्या नोटा आधीसारखंच वैध चलन म्हणून वापरता येतील. पॉलीमर नोटा आणि कागदी नोटा एकाच वेळी चलनात राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.