

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना एकरकमी ४० हजार रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. एवढंच नाही, तर या पैशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकही व्हायरल होत आहे. मात्र, या दाव्यामागचं सत्य वेगळंच आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही लिंकवर अर्ज करण्याआधी ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.
इन्स्टाग्रामवरच्या काही रीलमध्ये लाडकी बहीण योजनेचे थांबलेले हप्ते परत सुरू करण्यासाठी किंवा एकरकमी ४० हजार रुपये मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायला सांगितले जात आहे. या अर्जामध्ये आधार कार्डावरचे नाव, मोबाईल क्रमांक, तालुका आणि गावाची माहिती मागितली जातेय.
मात्र, ही संबंधित वेबसाईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाहीये. त्यामुळे महिलांनी अशा लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. ४० हजार रुपये मिळणार असल्याचा दावा दिशाभूल करणारा असून, राज्य सरकारने अशा प्रकारच्या एकरकमी आर्थिक मदतीची घोषणा केलेली नाही.
दरम्यान, केवायसी प्रोसेसमधील अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यातल्या जवळपास ८१ लाख लाभार्थी महिलांना परत महिन्याला १५०० रुपये देण्यात येतील, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. केवायसी पूर्ण केली नाही तर महिन्यांचा हप्ता थांबू शकतो. अशा महिलांना परत योजनेचा लाभ मिळायला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. मात्र, दर महिन्याला १५०० रुपये मिळण्याची ही हमी आहे. त्याचा अर्थ एकरकमी ४० हजार रुपये मिळणार असा होत नाही.
महिलांनी अनोळखी वेबसाइटवर आधार कार्डाची माहिती भरू नका. ४० हजार रुपये मिळवून देण्याच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अर्जाच्या लिंकपासून सावध राहा. योजनेची माहिती आणि अर्जासंदर्भातल्या अपडेट्स फक्त शासनाच्या अधिकृत माध्यमांतून तपासा. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झालेल्या महिलांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांची वाट पाहावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.