पाकिस्तानी क्रिकेटर हैदर अली याला इंग्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २४ वर्षीय हैदरचा जन्म 2 ऑक्टोबर 2000 रोजी पंजाब प्रांतातील अटॉकमध्ये झाला आहे. त्याने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे आणि टी-20 सामने खेळले असून टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्याची संधी त्याला मिळाली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, हैदर अली रोहित शर्माला त्याचा आदर्श मानत असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील (PSL) इस्लामाबाद युनायटेडकडून तो खेळतो आणि 2023 मध्ये इंग्लंडच्या काउंटी क्लब डर्बीशायरमध्येही खेळला होता.
हैदर अली सध्या पाकिस्तान ए संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर होता. इंग्लंड लायन्सविरुद्ध काही सामने खेळण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. याचदरम्यान ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, या खेळाडूला भर मैदानात अटक करण्यात आली.
पोलिसांनी Reuters ला ईमेलद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, 4 ऑगस्ट 2025 रोजी बलात्काराची तक्रार मिळाली. त्यानंतर 24 वर्षीय एका खेळाडूला अटक करण्यात आली आहे.
हैदर अलीचा जन्म पंजाब प्रांतातील अटॉकमध्ये झाला. त्याचे वडील शेतकरी असून त्याचं कुटुंब घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा चुलतभाऊ रावळपिंडी रॅम्स टीमकडून खेळला आहे. हैदरने 2015 मध्ये टेप बॉल क्रिकेटपासून खेळाला सुरुवात केली होती. नंतर तो अल-फैसल क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाला.
हैदर अलीने 1 सप्टेंबर 2020 रोजी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय डेब्यू सामना खेळला. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2020 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध वनडेमध्ये डेब्यू केला. 2019 मध्ये त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. विकिपीडियानुसार, हैदर अली भारतीय फलंदाज रोहित शर्माचा मोठा चाहता असून त्यालाच तो आदर्श मानतो.
2022 साली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताविरुद्ध झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात हैदर अली पाकिस्तानकडून खेळला होता. मात्र या सामन्यात त्याला चांगला खेळ करता आला नाही. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तो केवळ 2 रन्स करून बाद झाला होता. हा सामना भारताने 4 विकेट्सनी जिंकला होता आणि विराट कोहलीने शानदार 82 रन्सची नाबाद खेळी केली होती.
हैदर अलीने पाकिस्तानसाठी 2 वनडे सामने खेळून 42 रन्स केल्या आहेत. त्याशिवाय 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32 डावांमध्ये खेळत त्याने 124.69 स्ट्राइक रेटने 505 रन्स केले आहेत. यामध्ये त्याने 3 अर्धशतकं झळकावली आहेत. 2023 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याच्या कामगिरीमुळे त्याला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.