

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच सवयीत बदल झालेले पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या खाण्यापिण्याच्या झोपेच्या सवयींमध्ये हे गंभीर बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या नकळत गंभीर आणि जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागतंय. पुढे महिलांबाबतची एक धक्कादायक माहिती तज्ज्ञांनी दिलेली आहे.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये आणि विशेषतः ५० वर्षांखालील महिलांमध्ये आतड्याचा कॅन्सर (Colon cancer) होण्याचं प्रमाण वाढताना दिसतय. पचनाशी संबंधित काही बदल हे सुरुवातीचे इशारे असू शकतात. त्यामुळे शरीरात दिसणारे काही संकेत वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.
पोटात सतत दुखणं हे त्यापैकी एक महत्त्वाचं लक्षण मानलं जात आहे. कधीकधी खाल्ल्यानंतर किंवा ताणतणावामुळे पोटदुखी होऊ शकते, पण जर ही वेदना सतत होत असेल आणि एका ठिकाणीच जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मुंबईतील Zen Multispeciality Hospital येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रॉय पतांकर यांच्या मते, दीर्घकाळ राहणारी पोटदुखी ही आतड्यांमध्ये गाठ किंवा इतर समस्या असल्याचे संकेत देत असते.
अचानक वजन कमी होणं हे सुद्धा गंभीर कारण ठरू शकतं. जर तुमच्या आहारात किंवा व्यायामात विशेष बदल होत नसतील आणि वजन कमी होत असेल, तर ते शरीरातील काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या पेशी शरीरातली ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरतात, त्यामुळे वजन कमी होण्यासोबत थकवा सुद्धा जाणवतो. कामाचा ताण किंवा कमी झोप यामुळे थकवा येऊ शकतो, पण कोलन कॅन्सरमुळे शरीरात आतून रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे रक्ताची पातळी कमी होते आणि व्यक्तीला सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. विश्रांती घेतल्यानंतरही थकवा कमी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, शरीरात दिसणारी ही लक्षणे नेहमीच कॅन्सरचीच असतील असं नाही. पण ती दीर्घकाळ राहिल्याने त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेत निदान झाल्यास उपचार जास्त प्रभावी ठरू शकतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.