गिलने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं आहे. इंग्लंडविरुद्ध खेळताना जिथे त्याने डाव सोडला होता, बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याने तिथूनच सुरुवात केली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली होती.
आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्याने १२५ चेंडूंचा सामना करत आपल्या वनडे कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले आहे. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार खेचले.
या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघासमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून ६९ धावांची भागीदारी केली. मात्र रोहित ४१ धावांवर माघारी परतला.
एका बाजूने विकेट्स जात होत्या, तर दुसऱ्या बाजूला गिल खंबीरपणे उभा होता. भारतीय संघाकडून विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे अनुभवी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र गिल कुठेही डगमगला नाही. त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गिलकडे उरकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळाल्यापासून गिलच्या फलंदाजीतही सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गिलने ही जबाबदारी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत स्विकारली होती.
त्याने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर अहमदाबादच्या मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली होती. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने जबाबदारी घेऊन फलंदाजी केली आणि आपल्या वनडे कारकिर्दीतील आठवं शतक झळकावलं. तर चॅम्पियन्स ट्रॉफीतील हे त्याचं पहिलंच शतक ठरलं आहे.
बांगलादेशला धूळ चारणं फार कठीण नव्हतं. मात्र भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान पाकिस्तानचं असणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यातही गिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या सामन्यातही गिल चमकला, तर भारताचा विजय जवळजवळ निश्चित आहे.`
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.