दिवाळीपूर्वी देशातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू होणार.
दिल्ली ते पटना प्रवास फक्त ११ तासांत पूर्ण होणार.
आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासाची खात्री.
रेल्वेच्या आधुनिकीकरणातील नवा टप्पा म्हणून ही ट्रेन ऐतिहासिक ठरणार.
भारतीय रेल्वेत दिवाळी आणि छठ पूजा यांसारख्या प्रमुख सणांच्या आधी देशातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही ट्रेन दिल्लीला थेट पटनाशी जोडणार आहे. तसेच हि ट्रेन अवघ्या ११ तासांत अंतर पार करेल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे शिवाय अत्याधुनिक सोयीसुविधांचा अनुभवही मिळणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्लीपर ट्रेनचा पहिला रेक तयार झाला असून त्याची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. सर्व प्रोटोटाइप प्रयोग देखील यशस्वी ठरले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये ही ट्रेन धावणार असून, त्याचा मार्ग अंतिम टप्प्यात आहे. अद्याप अचूक मार्ग निश्चित करण्यात आलेला नसला तरी ट्रेन दिल्ली–पटना, दिल्ली–दरभंगा किंवा दिल्ली–सीतामढी दरम्यान धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राजधानी एक्सप्रेस दिल्ली ते पटना हे अंतर सुमारे २३ तासांत पूर्ण करते. जर वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली–पटना मार्गावर धावली, तर हेच अंतर अवघ्या ११ ते ११.५ तासांत पूर्ण होईल. म्हणजे प्रवासाचा कालावधी अक्षरशः निम्मा होणार आहे. प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार असून, रेल्वेच्या दृष्टीने ही क्रांती मानली जात आहे.
या ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे ती विशेषतः लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी डिझाईन करण्यात आली आहे. सध्याच्या वंदे भारत चेअर कार ट्रेन दिवसाच्या प्रवासासाठी आहे, तर स्लीपर व्हर्जनमध्ये प्रवाशांना आरामदायी झोपेची सोय मिळेल. गाडीत आधुनिक इंटेरियर, बायो टॉयलेट्स, डिजिटल डिस्प्ले, हायटेक सुरक्षा यंत्रणा, ऑटोमॅटिक दरवाजे, तसेच ऊर्जा बचतीसाठी नवी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. प्रवाशांना आराम, सुरक्षितता आणि वेग या तीनही गोष्टींचा उत्तम मेळ मिळणार आहे.
१८० किमी प्रतितास या कमाल वेगाने धावणाऱ्या या गाडीमुळे प्रमुख मार्गांवरील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. रेल्वे बोर्डाच्या मते, सुरुवातीला निवडक मार्गांवर वंदे भारत स्लीपर धाववली जाणार असून, नंतर देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये तिचा विस्तार केला जाईल. यामुळे हवाई प्रवासाशी टक्कर देणारी ही रेल्वे सेवा ठरण्याची शक्यता आहे.
दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर लाखो प्रवासी आपल्या गावी परततात. या काळात गाड्यांमध्ये तुफान गर्दी असते. वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास प्रवाशांना अतिरिक्त सोय मिळेल आणि गर्दीचा ताण कमी होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे की, केंद्र सरकार भारतीय रेल्वेला जागतिक स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रवाशांच्या सोयीसाठी सतत नवे प्रयोग केले जात आहेत. हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प, नव्या पिढीचे कोच, डिजिटल सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उपाययोजना केली जात आहेत.
दिवाळीपूर्वी सुरू होणारी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस केवळ रेल्वे प्रवासात नवा अध्याय लिहिणार नाही, तर भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा मोठा टप्पा ठरणार आहे. प्रवाशांच्या अपेक्षा, वेगवान प्रवासाची गरज आणि सुरक्षिततेचा प्रश्न या सर्वांचा विचार करून ही ट्रेन आणली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.