
Nagpur Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नागपूर ते पुणे प्रवास जलद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी १० ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगद्वारे बेंगळुरू रेल्वे स्टेशनहून अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. त्यांनी केएसआर बेंगळुरु-बेलगाम आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मंत्री उपस्थित होते. नागपूर रेल्वे स्टेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अजनी (नागपूर) ते पुणे प्रवासाला वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसचा पुणे आणि नागपूरकरांना मोठा फायदा होणार आहे. या एक्स्प्रेसमुळे दोन्ही शहरातील व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराला प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसचा व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा लाभ होणार आहे.
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन असणार आहे. ही ट्रेन ८८१ किलोमीटर धावणार आहे. ही महाराष्ट्रातील १२ वी वंदे भारत ट्रेन आहे. नागपूर-पुणे ट्रेन ही वर्धा, वडनेरा, अकोला, शेगांव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्डलाइन या मार्गावरून धावणार आहे. ट्रेनला एकूण ८ कोच असणार आहे. यातील १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि 7 चेअर कार कोच असणार आहे. या ट्रेनमधून ५९० प्रवासी प्रवास करू शकतात.
नागपूरला 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखलं जातं. नागपूर मध्य भारतात 'हेल्थकेअर सिटी' म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही नागपूरशी खास कनेक्शन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरातील बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यामुळे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. नागपूरच्या रामटेकमध्ये प्राचीन राम मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे देखील आहेत. विदर्भात एम्ससारख्या अनेक प्रसिद्ध वैद्यकीय संस्था आहेत. तसेच नागपूरला 'भारतीय वाघांची राजधानी' असे देखील म्हटलं जातं. कारण या भागात अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत.
ट्रेन क्रमांक २६१०१ - पुणे- अजनी(नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेस दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजीपासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. आठवड्यातून सहा दिवस (मंगळवार वगळता) पुण्यातून सकाळी ६:२५ वाजता ट्रेन सुटेल. त्यानंतर सायंकाळी ६:२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस दिनाक १२ ऑगस्ट २०२५ पासून (सोमवार वगळता) अजनी येथून सकाळी ०९:५० वाजता सुटेल. त्यानंतर पुण्याला रात्री ९:५० वाजता पोहोचेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.