संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai police constables robbery case Juhu details : मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन पोलीस शिपायांवरच जबरी चोरी आणि मारहाणीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, या दोन्ही शिपायांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह सुमारे 9 लाख 45 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3.10 वाजण्याच्या सुमारास जुहू परिसरात घडली. फिर्यादी सुमित आंबेकर (वय 30) हे नेहरू रोड विलेपार्ले पश्चिम येथे राहतात आणि वांद्रे येथील ट्रायोफॉरेक्स या एका कंपनीत फॉरेन करन्सी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. तक्रारदार हे 25 मार्च 2026 रोजी नेहमीप्रमाणे कामावर आले असता कंपनीने त्यांना जुहू येथील कार्यालयात दहा हजार अमेरिकन डॉलरची डिलिव्हरी करण्यासाठी पाठविले असता काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून जबरदस्तीने गाडीत बसवून मोबाईल फोन हिसकावून घेत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांच्याकडून करण्यात आला आहे.
आरोपींनी आंबेकर यांना गाडीत बसविल्यानंतर त्यांचे खिसे तपासून खिशातील दहा हजार अमेरिकन डॉलर काढून घेतले तसेच फिर्यादींना धमकावून मोबाईलचा पासवर्ड देखील घेतला यावेळी गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादींची बॅग देखील ताब्यात घेऊन त्यातील पंधरा हजार रुपये देखील काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींनी फिर्यादींना घरी कोण कोण आहेत तसेच कंपनी आणि कंपनीतील स्टाफ बद्दल देखील विचारणा केली यावेळी कारचालकाला गाडी बोरिवली युनिटला घेऊन चालण्याची सूचना केली. गाडी पुढे गेल्यानंतर त्यातील दोघांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र आंबेकर यांना दाखविले आणि त्यांना धमकावून तुझ्यावर किती केसेस आहेत तुला केसेस वाढवायचा आहेत का असे धमकावले.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांचा मोबाईल देखील तपासला आणि कोणाशी संपर्क साधू दिला नाही. तसेच “तुझ्यावर केस आहे” असे सांगून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात जुहू पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून सब-इन्स्पेक्टर राहुल प्रभाकर शिंदे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई पोलीस दलातील दोन शिपायांवरच जबरी चोरी आणि मारहाणीचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली असून या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबाबत प्रश्न उपस्थित होत असून पुढील तपासात नेमके सत्य समोर येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.