

नोव्हेंबर महिना संपत आला तरी पावसाळा अद्याप संपला नाही. काही राज्यात थंडीच्या दिवसात पाऊस पडत आहे. आज देशातील अनेक राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याता अंदाज आहे. देशातल्या किनारपट्टी भागातील १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर उर्वरीत भारतातील काही राज्यात थंडीने कहर केला आहे. तर काही ठिकाणी तापमान वाढले असून उकाडा जाणवू लागला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी अनेक राज्यांसाठी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, माहे, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक येथील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पैकी काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. लक्षद्वीपमध्ये देखील मुसळधार पाऊस पडेल. या ठिकाणी ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहतील.
आज पूर्व भारतातील राज्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडेल. या बेटांवर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी वाढत चालली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्येही थंडीचे आगमन झाले आहे. पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मेघालय, आसाम, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशा येथे आज दाट धुक्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात तापमानात वाढ होत चालली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात थंडी आहे पण ती देखील कमी होत चालली आहे. तर काही ठिकाणी उकाडा वाढला आहे. पुण्यात सकाळी गारवा दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. पुणे शहर आणि परिसरात सध्या हवामानात बदल जाणवत असून सकाळच्या वेळी हवेत गारवा तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.आज शहराचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता जवळपास नसल्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.