कल्याणमधील वाहतूक कोंडी फुटणार
सर्वात मोठा उड्डाणपूल खुला होणार
कल्याणकरांचा त्रास कमी होणार
Kalyan's Largest SATIS Flyover To Open by January 2026 : कल्याणकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि वाहतूक कोंडीच्या त्रासापासून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. कल्याणमधील सर्वात मोठा उड्डाणपूल हा जानेवारी २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत आहेत. हा उड्डाणपूल 'स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम' म्हणेजच सॅटिस (SATIS) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३ उड्डाणपुलांपैकी सर्वात मोठा असा उड्डाणपूल अ (Flyover A) हा आहे.
स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीमच्या अंतर्गत रेल्वे स्थानकाच्या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर करण्यासाठी उड्डाणपूल प्रकल्प राबवले जातात. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या हिशोबाने उड्डाणपूल बांधला जात आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च कायदेशीर वादांमुळे वाढला.
सुरुवातीला या प्रकल्पासाठीचा खर्च ४९८ कोटी रुपये इतका होता, आता तो वाढून ६०२ कोटींवर गेला आहे. २०२१ च्या सुरुवातीला प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. जुलै २०२३ पर्यंत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कायदेशीर वादांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. या अडचणींवर मात करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने रेल्वेकडून ३५ वर्षांसाठी ४९१ चौरस मीटर जागा भाड्याने घेत रस्त्यांचे रुंदीकरण केले.
सॅटिस अंतर्गत ३ उड्डाणपूल प्रकल्पांपैकी उड्डाणपूल अ (Flyover A) हा सर्वात मोठा उड्डाणपूल आहे. १.१२ किमी लांब असलेला हा उड्डाणपूल सुभाष चौक ते बैल बाजार दरम्यान आहे, हा पूल कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून जाईल. या प्रकल्पातील ९३० मीटर बांधकाम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करुन नव्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा उड्डाणपूल खुला करण्याचा मानस आहे.
उड्डाणपूल अ यासोबत उड्डाणपूल क आणि उड्डाणपूल ड या प्रकल्पांवरही काम सुरु आहे. या दोन्ही उड्डाणपुलांचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपूल क (Flyover C) च्या २०६ मीटर लांबीपैकी १८१ मीटरचे आणि उड्डाणपूल ड (Flyover D) च्या २९७ मीटर लांबीपैकी २३५ मीटर काम पूर्ण झाले आहे. अ, क आणि ड हे तिन्ही पूल एकमेकांना जोडलेले असतील. उड्डाणपूल अचे काम जानेवारी २०२६ तर उड्डाणपूल क आणि उड्डाणपूल ड यांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.