राज्यात 29 महापालिकांचा कल शुक्रवारी हाती आला असून 25 ठिकाणी भाजपने सत्ता काबीज केली आहे. आता काही ठिकाणी महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी महापौरपदासाठी लागत असणाऱ्या बहुमताला एकमेकांचीच मदत घ्यावी लागणार हे निश्चित आहे.अशातच विदर्भातील चंद्रपूरमध्ये कॉँग्रेस आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत 17 प्रभागात 66 जागांवर निवडणूक पार पडली. कॉँग्रेसने या शहरात चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुंनगंटीवार विरुद्ध कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये ही लढत होती. कॉँग्रेस आणि भाजप यांना दोघांनाही बहुमताचा टप्पा गाठता आला नाहीये. त्यामुळे आगामी काळात कोणाचा महापौर विराजमान होईल याची उत्सुकता लागली आहे.
चंद्रपूरच्या महापौरपदावर काँग्रेस आणि भाजपनेही दावा केल्यानेही राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 सदस्य आहेत. यात साध्या बहुमतासाठी 34 एवढे संख्याबळ आवश्यक आहे. काँग्रेसकडे 30 सदस्य असून, त्यांना बहुमतासाठी केवळ चार सदस्य आवश्यक आहेत. बहुमताचे आकडे जुळवण्यासाठी काँग्रेसला मोठी संधी आहे. याच पक्षाचे दोन बंडखोर निवडून आले असून, बसप आणि MIM यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या चौघांना जवळ घेतल्यास काँग्रेस ड्रिम फिगर पार करू शकते.
सोबतच ठाकरे गटाचे सहा सदस्य आहेत. गरज पडल्यास सेनेची मदतही घेतली जाऊ शकते. त्यासाठी बोलणी सुरू आहे. दरम्यान शिवसेनेचे महत्व या वाढल्याने महापौरपद ठाकरे गटाकडून मागितले जात असल्याची चर्चा आहे. या मागणीला काँग्रेस तयार होणे शक्य नसल्याने काँग्रेस थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. बहुमतापासून केवळ चार जागा कमी असतानाही काँग्रेसला मोठी धावपळ करावी लागत असल्याचे इथे बघायला मिळत आहे.
तर दुसरीकडे भाजपनेही महापौर आमचाच होईल, असा धक्कादायक दावा केल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या पक्षाच्या खेळीकडे लागले आहे. इथे भाजपकडे 23 आणि शिंदे सेनेचा एक असे चोवीस सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी आणखी दहा जागांची गरज आहे. ही गरज शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय पूर्ण करणे अशक्य आहे. आणि उद्धव ठाकरेंची सेना भाजपबरोबर जाणे, हेही सध्या कालसंगत दिसत नाही. मग भाजपने दावा कोणत्या आधारावर केला, हे एक कोडेच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.