गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरेच्या दरात मोठी घसरण
ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२२ ऑगस्टच्या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी प्रमुख शहरांमध्ये प्रति किलो १२ ते १६ रुपयांपर्यंत घट झाली
मुंबईत साखरेचा दर ६८ वरून ५४रुपये प्रति किलो झाला
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सणासुदीच्या काळामध्ये साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २२ ऑगस्टच्या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये साखरेच्या दरात १२ ते १६ रुपयांची घसरण झाली. प्रत्येक शहरानुसार साखरेच्या दरामध्ये बदल पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये साखरेच्या दरात १४ रुपयांची घसरण झाली. २२ ऑगस्ट रोजी साखरेचे दर ६८ होते आज साखर ५४ रुपयांना विकली जात आहे. कानपूरमध्ये दर ६९ वरून ५३ रुपयांवर, तर रांचीमध्ये ७० वरून ५५ रुपयांवर आले. कोलकाता आणि गुवाहाटीमध्येही २२ दिवसांत दरात प्रति किलो सुमारे १५ रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.
केंद्र सरकारने साखर कारखान्यांना फक्त पाक्षिक कोट्यानुसारच साखरेची विक्री आणि पुरवठा करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, कारखान्यांनी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी साखर विकल्यास किंवा पाठवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या कारखान्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई होऊ शकते. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले की, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील शिल्लक साखर दुसऱ्या पंधरवड्याच्या साखर कोट्यात पुढे नेण्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही. म्हणजेच, साखर कारखान्यांना त्या कालावधीसाठी मिळालेल्या कोट्यानुसारच विक्री आणि पुरवठा करावा लागेल.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ३० ऑगस्ट रोजीच्या अधिसूचनेद्वारे ५८७ साखर कारखाने आणि दोन रिफायनरींना सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी एकूण १३ लाख मेट्रिक टन (LMT) साखरेचा कोटा वाटप केला होता. उत्तर प्रदेशला अंदाजे ४.२० लाख टनचा सर्वाधिक कोटा मिळाला आहे. महाराष्ट्राला अंदाजे ४.१० लाख टन, तर कर्नाटकला १.७७लाख टन कोटा वाटप करण्यात आला आहे. तामिळनाडू, गुजरात, बिहार आणि पंजाब यांना अंदाजे २४,००० ते ४४,००० टन दरम्यानचा कोटा मिळाला आहे.
सरकारने साखर कारखान्यांमधील साठ्यावर देखरेखही वाढवली आहे. सर्व कारखान्यांनी सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यासाठी सुरुवातीचा साठा, उत्पादन, विक्री, पाठवणी, वितरण आणि अखेरचा साठा यांचा तपशील १८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. साखर विक्री झाल्यापासून ७ दिवसांच्या आत तिची पाठवणी सुनिश्चित करण्याचे निर्देश कारखान्यांना देण्यात आले आहेत. पाठवणीशी संबंधित जीएसटी बिलांची केंद्रीय आणि राज्य अधिकाऱ्यांकडून संयुक्त विशेष तपासणीत पडताळणी केली जाईल.
मुंबई - १४ रुपयांची घसरण होऊन दर ५४ रुपये झाले.
दिल्ली - १३ रुपयांची घसरण होऊन दर ५५ रुपये झाले.
कानपूर - १६ रुपयांची घसरण होऊन दर ५३ रुपये झाले.
रायपूर - १३ रुपयांची घसरण होऊन दर ५५ रुपये झाले.
कोलकाता - १५ रुपयांची घसरण होऊन दर ५५ रुपये झाले.
हैदराबाद - १६ रुपयांची घसरण होऊन दर ५४ रुपये झाले.
चेन्नई - १२ रुपयांची घसरण होऊन दर ५८ रुपये झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.