संदीप नागरे, साम टीव्ही
हिंगोली: एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो, देशाच्या प्रगतीचा आणि आधुनिकतेचा ढोल वाजवतो, मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात आजही मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात स्मशानभूमीत शेड उपलब्ध नसल्याने, नागरिकांना एका मृत ज्येष्ठ महिलेवर भर पावसात, उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अंत्यविधी सुरू असतानाच अचानक मुसळधार पाऊस आल्याने सरणावर तब्बल ३० लिटर डिझेल ओतून चिता पेटवावी लागली.
डोंगरकडा फाटा येथे असलेल्या या स्मशानभूमीची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. गावात अंत्यसंस्कारासाठी शेड उभारण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी केला आहे.
काल एका ज्येष्ठ महिलेच्या अंत्यविधीसाठी गावकरी आणि नातेवाईक गोळा झाले होते. मात्र, अंत्यसंस्काराच्या अगदी मोक्याच्या क्षणी पावसाने जोरदार हजेरी लावली. स्मशानभूमीवर साधे छप्परही नसल्याने लाकडे ओली झाली. अखेर नाईलाजास्तव ग्रामस्थांनी जवळून तब्बल ३० लिटर डिझेल आणून ते सरणावर ओतले आणि चिता पेटवली. या दरम्यान अंत्यविधीसाठी आलेले सर्वच नागरिक पावसात पूर्णपणे भिजले होते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या अमानवीय प्रकारानंतर 'वंचित बहुजन आघाडी' आक्रमक झाली आहे. प्रशासनाने तातडीने या स्मशानभूमीत शेड आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.