Vaginal discharge saam tv
लाईफस्टाईल

Vaginal discharge: योनीतून पांढरा स्राव होणं सामान्य की संसर्गाचे लक्षण? महिलांनो ‘हे’ बदल दुर्लक्षित करू नका

White vaginal discharge: योनीतून होणारा पांढरा किंवा पारदर्शक स्राव अनेकदा सामान्य असतो. मात्र दुर्गंधी, खाज, जळजळ, वेदना, रंगातील बदल किंवा असामान्य रक्तस्रावासोबत स्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. संसर्गाची कारणे आणि योग्य स्वच्छतेच्या सवयींबद्दल जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

महिलांच्या योनीतून होणारा पांढरा किंवा पारदर्शक स्राव ही अनेकदा शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असते. मासिक पाळीच्या चक्रानुसार या स्रावाचे प्रमाण, रंग आणि घट्टपणामध्ये बदल होऊ शकतो. मात्र स्रावाच्या नेहमीच्या स्वरूपात अचानक बदल झाला आणि त्यासोबत दुर्गंधी, खाज, जळजळ किंवा वेदना जाणवू लागल्या, तर ते संसर्गाचे लक्षण असू शकते. त्यामुळे अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

योनीतून होणारा स्राव हा महिलांच्या शरीरातील सामान्य प्रक्रिया आहे. योनी आणि गर्भाशयाच्या मुखातील ग्रंथींमधून हा स्राव तयार होतो. योनी स्वच्छ आणि ओलसर ठेवण्यास त्याची मदत होते. त्यामुळे प्रत्येक वेळी पांढरा स्राव दिसला म्हणजे संसर्ग झाला असे नाही.

मासिक पाळीच्या चक्रानुसार स्रावामध्ये नैसर्गिक बदल होतात. ओव्ह्युलेशनच्या वेळी स्राव अधिक पारदर्शक, पातळ आणि चिकटसर दिसू शकतो. गर्भधारणेदरम्यान किंवा शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास स्रावाचे प्रमाण वाढू शकते. तीव्र किंवा दुर्गंधी नसलेला, पारदर्शक, पांढरा किंवा किंचित फिकट पांढरा स्राव आणि त्यासोबत खाज किंवा वेदना नसतील, तर साधारणपणे घाबरण्याचे कारण नसते.

स्रावात कोणते बदल धोक्याचे?

स्रावाचा रंग, वास किंवा घट्टपणा अचानक बदलला, तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्रावाला तीव्र किंवा अप्रिय वास येत असेल, त्याचा रंग पिवळा किंवा हिरवा झाला असेल, तो दह्यासारखा घट्ट झाला असेल किंवा त्यासोबत खाज, जळजळ, चुरचुर किंवा वेदना होत असतील, तर संसर्गाची शक्यता असू शकते.

अशा असामान्य स्रावामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातील एक म्हणजे बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस. योनीतील सामान्य जिवाणूंचे संतुलन बिघडल्यामुळे ही समस्या होऊ शकते. यामध्ये पातळ, करड्या-पांढऱ्या रंगाचा स्राव होऊ शकतो. त्याला माशांसारखा विशिष्ट वासही येऊ शकतो.

यीस्ट इन्फेक्शन किंवा व्हल्वोव्हॅजायनल कॅन्डिडायसिसमध्ये पांढरा आणि घट्ट स्राव दिसू शकतो. यासोबत तीव्र खाज आणि जळजळ होण्याची शक्यता असते.

याशिवाय लैंगिक संबंधातून पसरणारे काही संसर्गही असामान्य स्रावाचे कारण ठरू शकतात. ट्रायकोमोनायसिस, क्लॅमिडिया आणि गोनोरिया यांचा यामध्ये समावेश होतो. विशेष म्हणजे काही संसर्गांमध्ये फारशी लक्षणे दिसत नाहीत. काही वेळा कोणतेही लक्षणही दिसत नाही.

केवळ स्राव पाहून आजार ओळखता येतो का?

स्रावाचा रंग, वास किंवा घट्टपणा पाहून नेमका कोणता संसर्ग झाला आहे, हे ठरवता येत नाही. वेगवेगळ्या आजारांमध्ये एकसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे उपचारही नेमक्या कारणानुसार वेगळे असतात. यामुळे स्वतःहून मेडिकल स्टोअरमधून अँटीफंगल औषधे किंवा अँटिबायोटिक्स घेणे टाळावे. विशेषतः समस्या यीस्ट इन्फेक्शनमुळे नसल्यास चुकीची औषधे घेतल्यामुळे योग्य आजाराचे निदान होण्यास उशीर होऊ शकतो.

“योनीतून होणाऱ्या स्रावाचा केवळ रंग किंवा प्रमाण पाहून घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक महिलेच्या शरीरासाठी नेहमी काय सामान्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मात्र नेहमीच्या स्रावात सतत बदल होत असेल किंवा त्यासोबत दुर्गंधी, खाज, जळजळ, ओटीपोटात वेदना, मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव, लघवी करताना किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण एकाच लक्षणामागे वेगवेगळी कारणे असू शकतात आणि त्यानुसार उपचारही वेगळे असतात,” असे डॉ. आरोही तासगावकर, कन्सल्टंट गायनॅकॉलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन, किम्स हॉस्पिटल, ठाणे यांनी सांगितले.

स्वच्छता राखताना ही काळजी घ्या

योनीची स्वच्छता राखण्यासाठी वारंवार धुणे किंवा जास्त प्रमाणात साबण वापरणे आवश्यक नाही. योनी स्वतःची स्वच्छता राखते. त्यामुळे सुगंधी वॉश, डूशिंग किंवा योनीच्या आतील भागात वापरले जाणारे तीव्र साबण वापरल्यास तेथील नैसर्गिक वातावरण बिघडू शकते. यामुळे जळजळ होण्याची शक्यताही वाढू शकते.

बाह्य जननेंद्रियाचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे महत्त्वाचे आहे. ओले कपडे किंवा अंतर्वस्त्रे जास्त वेळ घालणे टाळावे. सुरक्षित लैंगिक संबंधांचा सराव करणेही आवश्यक आहे. कंडोमचा वापर केल्याने अनेक लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

‘या’ परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

स्रावाची समस्या सतत होत असेल किंवा वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्रावाचे प्रमाण किंवा स्वरूप खूप बदलले असेल आणि त्यासोबत ओटीपोटात वेदना, ताप, जननेंद्रियाच्या भागात जखमा, असामान्य रक्तस्राव किंवा गर्भधारणा असेल, तरी वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.

समस्येचे नेमके कारण शोधण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करू शकतात. गरज असल्यास प्रयोगशाळेतील काही चाचण्याही करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्यानंतर कारणानुसार योग्य उपचार ठरवले जातात.

प्रत्येक पांढरा स्राव संसर्ग नसतो

योनीतून होणारा प्रत्येक पांढरा स्राव हा संसर्गाचे लक्षण नसतो. मासिक पाळीचे चक्र, अंडोत्सर्जन, गर्भधारणा आणि हार्मोन्समधील बदलांमुळे स्रावामध्ये नैसर्गिक बदल होऊ शकतात.

मात्र आपल्या शरीरासाठी नेहमी काय सामान्य आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये लक्षणीय किंवा सतत बदल जाणवत असेल आणि त्यासोबत इतर त्रासही होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुर्णेकर कुटुंबीयांच्या घरी शिरली अज्ञात महिला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Asian Games: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णपदक

CJP च्या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा! मुंबईत मोठा गोंधळ; पाहा VIDEO

Saturday Horoscope: आज या ४ राशींना मिळणार मोठी संधी; रखडलेली कामं मार्गी लागतील, वाचा राशीभविष्य

Sindhudurg Beach : कोकणातलं स्वर्ग सौंदर्य! सिंधुदुर्गतील 'या' निळ्याशार समुद्राचं आकर्षणच काही औरच

SCROLL FOR NEXT