

फॅटी लिव्हरचा आजार अनेकदा कोणतीही लक्षणं न दाखवता शरीरात वाढत असतो. सुरुवातीच्या काळात या आजाराची ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपल्याला फॅटी लिव्हर आहे, याची कल्पनाही नसते. मात्र काही वेळा चेहरा आणि त्वचेवर होणारे छोटे बदल शरीरात काहीतरी बिघडत असल्याचे संकेत देऊ शकतात.
चेहऱ्यावर सूज येणं, त्वचेचा रंग बदलणं किंवा खाज आणि जळजळ होणं अशी लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं दिसली म्हणजे फॅटी लिव्हरच आहे असं नाही. मात्र अशी लक्षणं वारंवार दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
यकृतामध्ये म्हणजेच लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागली की, त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. दारूचं अतिसेवन हे लिव्हरमध्ये चरबी वाढण्याचं एक कारण आहे. मात्र दारू न पिणाऱ्या व्यक्तीलाही फॅटी लिव्हर होऊ शकतो. जास्त कॅलरी आणि जास्त चरबी असलेला आहार, वजन वाढणं आणि शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होणं यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजेच NAFLD होऊ शकतो.
काही लोकांना या समस्येची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. तर काहींना सतत थकवा जाणवणं, पोटात अस्वस्थता किंवा इतर सामान्य त्रास होऊ शकतात. काही वेळा चेहरा आणि त्वचेवर होणारे बदलही शरीरात यकृताशी संबंधित समस्या असल्याचा संकेत देऊ शकतात.
चेहऱ्यावर सतत सूज दिसणं हे लक्ष देण्यासारखं लक्षण आहे. लिव्हरचा आजार पुढच्या टप्प्यात गेल्यास यकृताला शरीरासाठी आवश्यक असलेली काही प्रथिने तयार करणं कठीण होऊ शकतं. याचा परिणाम शरीरातील रक्ताभिसरण आणि द्रवपदार्थांच्या संतुलनावर होऊ शकतो. यामुळे चेहऱ्यावर, डोळ्यांच्या आजूबाजूला आणि गालांवर सूज दिसू शकते.
मानेच्या घडीत किंवा मानेभोवतीची त्वचा काळसर होणं हा आणखी एक बदल आहे. या स्थितीला 'अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स' असं म्हणतात. शरीरात इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर न झाल्यास म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यास हा बदल दिसू शकतो. इन्सुलिन रेझिस्टन्सचा फॅटी लिव्हरशी संबंध असू शकतो. हा बदल फॅटी लिव्हरचा थेट संकेत नसला तरी तो शरीरातील इन्सुलिनशी संबंधित समस्या असल्याचं लक्षणं असू शकतो.
काही लोकांच्या चेहऱ्यावर सतत लालसरपणा दिसतो. चेहऱ्यावरच्या छोट्या रक्तवाहिन्या स्पष्ट दिसणं, लालसरपणा वाढणं, छोटे लाल दाणे येणं अशी लक्षणं दिसू शकतात. या त्वचेच्या समस्येला 'रोसेशिया' म्हणतात. रोसेशिया केवळ यकृताच्या आजारामुळे होत नाही. मात्र चेहऱ्यावर सतत लालसरपणा किंवा वारंवार असे त्रास होत असतील आणि त्यासोबत चेहऱ्यावर सूज किंवा त्वचेचा रंग बदलण्यासारखे इतर बदलही दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दीर्घकाळ राहणाऱ्या लिव्हरच्या काही आजारांमुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळू शकत नाहीत. त्यात झिंकसारख्या पोषक घटकांचाही समावेश होतो. NAFLD असलेल्या काही लोकांमध्ये झिंकची कमतरता आढळू शकते. झिंकची कमतरता असल्यास तोंडाच्या आसपास त्वचेवर पुरळ, छोटे दाणे किंवा जळजळ होऊ शकते.
यकृताचं काम बिघडल्यास शरीरातील पित्ताशी संबंधित घटक म्हणजेच बाइल सॉल्ट्स रक्तामध्ये साचू शकतात. यामुळे शरीरावर खाज येऊ शकते. काही वेळा ही खाज चेहऱ्यावरही जाणवू शकते. अशा खाजेवर वारंवार खाजवल्याने त्रास कमी होण्याऐवजी त्वचेची जळजळ वाढू शकते.
फॅटी लिव्हरचा आजार गंभीर टप्प्यावर गेल्यास काही रुग्णांमध्ये कावीळ म्हणजेच 'जॉन्डिस' होऊ शकते. यामध्ये त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू लागतो. शरीरातील जुन्या लाल रक्तपेशी तुटल्यानंतर 'बिलिरुबिन' नावाचा पिवळा द्रव्ययुक्त पदार्थ तयार होतो. यकृताचं काम व्यवस्थित न झाल्यास बिलिरुबिन शरीरात जास्त प्रमाणात साचू शकतो. त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.