

रक्ताच्या तपासणीत कोलेस्ट्रॉल वाढल्याचं समोर आलं की, अनेकांना लगेच हार्ट अटॅकची भीती वाटते. पण रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसणं म्हणजे उद्या किंवा लगेच हार्ट अटॅक येणारच, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र कोलेस्ट्रॉलचा वाढलेला स्तर दुर्लक्षित करणंही योग्य नाही.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. विवेक टंडन यांनी कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे प्रकार त्याचा हृदयावर होणारा परिणाम आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिलीये. नेमकं LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय, याबद्दल जाणून घेऊया.
लिपिड प्रोफाइल रक्त तपासणी केली की त्यामध्ये LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्स असे शब्द दिसतात. हे शब्द सोप्या भाषेत समजून घेणं महत्त्वाचं आहे.
LDL म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन. याला साधारणपणे 'वाईट कोलेस्ट्रॉल' म्हटलं जातं. कारण LDL जास्त झालं तर ते रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर साचू शकतं. याला प्लाक म्हणतात. हा प्लाक वाढत गेला तर रक्तवाहिन्यांमधून रक्त जाण्याची जागा कमी होते. रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो.
HDL म्हणजे हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन. हे रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल गोळा करून ते परत लिव्हरपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. लिव्हर त्यावर प्रक्रिया करून ते शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं. म्हणून HDL ला सामान्यपणे 'चांगलं कोलेस्ट्रॉल' म्हटलं जातं.
ट्रायग्लिसराइड्स हा कोलेस्ट्रॉल नसून रक्तातील चरबीचा एक वेगळा प्रकार आहे. आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेतल्या तर शरीर त्या अतिरिक्त ऊर्जेचं ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर करतं. जास्त तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात. ट्रायग्लिसराइड्स जास्त आणि HDL कमी असेल तर हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
हाय कोलेस्ट्रॉलची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा त्याची स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. व्यक्तीला आपण अगदी ठणठणीत असल्यासारखं वाटत असतं, पण रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू बदल होत असू शकतात. अनेक वेळा हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतरच कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षात येतं.
वय वाढल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करणं महत्त्वाचं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कमी वयात हार्ट अटॅक आला असेल तर कोलेस्ट्रॉलकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. तसंच उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनीही नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
आपल्या रोजच्या खाण्या-पिण्याच्या आणि जीवनशैलीच्या सवयींचा कोलेस्ट्रॉलवर परिणाम होतो. समोसा, कचोरी, पिझ्झा, बर्गर, डालडा आणि पॅकेटमधील चिप्ससारख्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचं प्रमाण जास्त असू शकतं. अशा पदार्थांचं जास्त सेवन केल्याने LDL वाढण्यास हातभार लागू शकतो. त्याऐवजी आहारात हिरव्या भाज्या, फळं, डाळी, ओट्स आणि फायबर असलेले पदार्थ वाढवणं फायदेशीर ठरू शकतं.
बदाम आणि अक्रोड यांसारख्या कडधान्यांमध्ये चांगले फॅट्स असतात. योग्य प्रमाणात त्यांचा आहारात समावेश केल्याने हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते. मात्र कोणताही पदार्थ किती प्रमाणात खायचा, हे व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीनुसार बदलू शकतं.
दिवसभर एकाच जागी बसून राहण्याची सवय आरोग्यासाठी चांगली नाही. आठवड्यातून किमान पाच दिवस साधारण ३० ते ४० मिनिटं वेगाने चालणं, सायकल चालवणं किंवा आपल्या क्षमतेनुसार हलका व्यायाम करणं उपयोगी ठरू शकतं. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच शरीराची कार्यक्षमता आणि चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते.
अनेक जण नियमित चालतात, घरचं साधं जेवण घेतात, तरीही त्यांचा कोलेस्ट्रॉल वाढलेला दिसतो. यामागे फक्त आहार किंवा व्यायाम नसतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलचा मोठा भाग लिव्हर स्वतः तयार करतं. काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे लिव्हर गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल तयार करू शकतं.
अशा परिस्थितीत केवळ आहारात बदल करून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येईलच असं नाही. काही रुग्णांना डॉक्टर स्टॅटिनसारखी औषधं देऊ शकतात. ही औषधं लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्याचं प्रमाण कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांमधील प्लाक स्थिर ठेवण्यास मदत करतात. डॉक्टरांनी औषधं सुरू केली असतील तर स्वतःच्या मनाने ती बंद करू नयेत. औषधांबाबत कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
रिपोर्टमध्ये LDL वाढलेलं आलं म्हणून लगेच हार्ट अटॅक येणार, असा अर्थ काढण्याची गरज नाही. डॉक्टर केवळ कोलेस्ट्रॉलचा एक आकडा पाहून उपचार ठरवत नाहीत. वय, रक्तदाब, मधुमेह, धूम्रपानाची सवय, कुटुंबातील हार्ट अटॅकचा इतिहास आणि इतर आरोग्यविषयक गोष्टी एकत्र पाहिल्या जातात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचा उद्देश फक्त रिपोर्टमधला एक आकडा कमी करणं नाही. रक्तवाहिन्या निरोगी ठेवणं आणि भविष्यात हृदयाशी संबंधित समस्या होण्याचा धोका कमी करणं हे त्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसलं तर घाबरून जाण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.