Surabhi Jayashree Jagdish
लिव्हर आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाची कामं करतं. आपण खाल्लेल्या अन्नातून मिळणाऱ्या पोषक घटकांवर प्रक्रिया करण्यास आणि ऊर्जा साठवून ठेवण्यास ते मदत करते. शरीरातील काही घातक पदार्थांवर प्रक्रिया करून ते बाहेर काढण्याचे कामही लिव्हर करते.
फॅटी लिव्हर झाल्यावर सुरुवातीला अनेक लोकांना काहीही त्रास जाणवत नाही. काही लोकांना मात्र सतत थकवा, शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं किंवा लक्ष देताना अडचण येऊ शकते. काही जणांना पोटाच्या आसपास जडपणा जाणवू शकतो.
वजन जास्त असल्यास ते हळूहळू कमी करणं फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्यासोबतच शरीराची हालचाल वाढवणं गरजेचं आहे. खूप कमी वेळात जास्त वजन कमी करण्याऐवजी हळूहळू वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा.
फॅटी लिव्हर असल्यास जेवणातील जास्त तेल आणि चरबी कमी करणं योग्य ठरतं. तळलेले पदार्थ आणि खूप तेलकट पदार्थ कमी खावेत. जेवण बनवताना तेलाचं प्रमाणही नियंत्रणात ठेवावं.
कोल्डड्रिंक आणि इतर गोड पेयांमध्ये भरपूर साखर असते त्यामुळे त्यांचं सेवन कमी करावं. मिठाई, केक, बिस्किटं आणि जास्त साखर असलेले पदार्थही कमी खाणं चांगलं आहे. रिफाइंड साखरेचं प्रमाण कमी करून साधा आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा.
फॅटी लिव्हरमध्ये रोज शरीराची हालचाल करणं खूप उपयोगी ठरतं. चालणं, योग, सायकल चालवणं, पोहणं किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यापैकी तुम्हाला हवा तो व्यायाम करा. सुरुवातीला कमी वेळ व्यायाम करून हळूहळू त्याची सवय लावून घ्यावी.
आपल्या रोजच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करावा. फळं खाताना त्यांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणं चांगलं आहे. सूपसारखे पौष्टिक पदार्थही आहारात घेता येतात आणि काही लोकांसाठी मर्यादित प्रमाणात कॉफी घेणंही योग्य ठरू शकते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.