भात म्हणजे लठ्ठपणाचं मूळ कारण आहे, असा अजूनही लोकांचा समज आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात सर्वात आधी ताटातून भात गायब होतो. पोटावर चरबी येते किंवा वजन वाढतं, याचं कारण भात आहे असं सर्वसामान्य समज प्रचलित झाला आहे. त्यामुळे अगदी थोडा भात खाल्ला तरी अनेकांना अपराधी वाटू लागतं. पण खरंच भात इतका दोषी आहे का? भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?
तज्ज्ञांच्या मते, ‘भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं’ ही गोष्ट मोठ्या प्रमाणात एक गैरसमज आहे. खरा प्रश्न आपण किती भात खातो, तो कसा शिजवतो आणि त्यासोबत आपली जीवनशैली कशी पॅटर्न कसा आहे, यावर अवलंबून असतं. भात हा कार्बोहायड्रेट असून तो सहज पचतो आणि शरीराला झटपट ऊर्जा देतो. पण जेव्हा हा भात जास्त प्रमाणात, कोणतेही प्रोटीन किंवा भाज्या न घेता खाल्ला जातो आणि त्यानंतर शरीराची हालचाल कमी होते, तेव्हा इतर अन्नाप्रमाणेच त्याचा परिणाम वजनवाढीच्या स्वरूपात होतो.
पोषणतज्ज्ञ डॉ. मंजरी चंद्रा सांगतात की, भाताचं मूल्य समजण्यासाठी संपूर्ण भारतीय आहाराकडे एकत्रितपणे पाहणं गरजेचं आहे. आपला आहार आधीच कार्बोहायड्रेट्सने भरलेला असतो. आपली हालचाल फारच कमी असते आणि आपण दिवसातून बहुतेक वेळा गहू, भात, मैदा, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खात असतो,”
डॉ. चंद्रा पुढे म्हणतात की, या प्रकारच्या आहाराला शरीर insulin नावाचं हार्मोन अधिक प्रमाणात तयार करून प्रतिसाद देतं. इन्सुलिन हे चरबी साठवण्याचं काम करतं. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात घेतलं की शरीरात चरबी साठू लागते. ही चरबी फक्त बाहेरून दिसणाऱ्या स्वरूपातच नसते, तर ती आतल्या अवयवांभोवती साठते जी अधिक धोकादायक मानली जाते.
या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, भात पूर्णपणे आहारातून काढून टाकण्याची गरज नाही. प्रमाण आणि योग्य नियोजन महत्त्वाचं आहे. जेव्हा भात मर्यादित प्रमाणात आणि भाज्या, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्ससोबत खाल्ला जातो तेव्हा तो शरीरात मोठ्या प्रमाणात घेतलेल्या साध्या पांढऱ्या भातासारखा रिएक्ट करत नाही. संतुलित आहार पचनाची गती नियंत्रित करतो, रक्तातील साखरेचा स्तर स्थिर ठेवतो आणि अधिक वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.
पांढरा आणि ब्राऊन भात याबाबतही अनेक गैरसमज आहेत. लोकांना वाटतं की ब्राऊन भात खूपच आरोग्यदायी असतो. मात्र डॉ. चंद्रा यांच्या सांगण्यानुसार, दोघांमधला फरक फारसा मोठा नाही. “ब्राऊन भात म्हणजे ब्राऊन ब्रेडसारखा. रंग बदलला आहे, पण ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण फारसं वेगळं नाही.
डॉ. चंद्रा पुढे म्हणतात की, रंग किंवा मार्केटिंगवर न जाता कमी प्रक्रिया केलेले प्रकार निवडणं जास्त फायद्याचं आहे. रेड राईस, ब्लॅक राईस किंवा उकड भात यांसारखे प्रकार अधिक पौष्टिक असतात. कारण त्यात नैसर्गिक तंतू आणि पोषक घटक जास्त प्रमाणात टिकून राहतात.
आजकालच्या बसून राहणाऱ्या जीवनशैलीमुळे भाताचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. पूर्वी लोक जास्त शारीरिक मेहनत करत होते, चालत फिरत किंवा शेतात काम करत होते. त्यामुळे भातासारख्या कार्बोहायड्रेटयुक्त अन्नाचं ऊर्जा रूपांतरण सहज होत होतं. आज मात्र दीर्घकाळ बसून काम केल्याने ही अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठली जाते.
भात हा पौष्टिकतेच्या दृष्टीने सर्वात उत्तम धान्य नसला तरी तो शत्रूही नाही. योग्य प्रमाणात घेतलेला भात, भाज्या, प्रथिने आणि चांगल्या चरबीयुक्त पदार्थांसोबत खाल्ल्यास तो आरोग्यदायी आहाराचा भाग होऊ शकतो. भाताला संपूर्ण ताटाचं केंद्रबिंदू बनवणं ही आपली चूक आहे.
वजन वाढ ही कधीच एका पदार्थामुळे होत नाही तर ती अतिखाणं, शारीरिक हालचालीचा अभाव, चुकीचा आहार आणि अनियमित जेवण या सवयींचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे भाताला दोष देण्याऐवजी आपल्या संपूर्ण आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणं अधिक योग्य ठरतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.