

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट अनेकांच्या अवयवांवर दिसू लागला आहे. कामानिमित्त बाहेर असणारे लोक हॉटेलचे जेवण, स्ट्रीट फूड्स, जंक फूड, तळलेले पदार्थ, खूप उष्ण किंवा खूप थंड पदार्थ खातात. याचा परिणाम त्यांच्या लिव्हरवर होत असतो. याचा परिणाम लिव्हर लगेच जाणवू देत नाही. साधारण वर्ष भराने तुम्हाला पोटाच्या अनेक तक्रारी जाणवतात आणि तज्ज्ञ तुम्हाला लिव्हर खराब झाल्याचे सांगतात.
तुम्हीसुद्धा बाहेरचे पदार्थ खाणं पसंत करत असाल तर तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करण्याची आवश्यकता आहे. कारण लिव्हर हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा अवयव असतो. जो संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्याची जबाबदारी घेतो. शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यापासून ते पचनक्रिया सुरळीत ठेवणे आणि ऊर्जा निर्माण करणे अशी अनेक महत्त्वाची कामे लिव्हर करत असतो. अशा वेळी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा योग्य वापर केल्याने तुम्ही लिव्हर निरोगी ठेवू शकता.
हळद हा त्यातला एक प्रभावी घटक मानला जातो. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन हे शक्तिशाली संयुग लिव्हरच्या पेशींची दुरुस्ती करण्यात मदत करतं. त्याचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीरातील सूज कमी करतात.
आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असतो आणि तो लिव्हरसाठी संरक्षण कवचासारखं काम करतो. आवळ्याचे सेवन केल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान होते, पचनसंस्था मजबूत राहते.
लसूणसुद्धा लिव्हरसाठी फायदेशीर ठरते. लसणामध्ये असे घटक असतात जे लिव्हरमधील डिटॉक्स करणारे एन्झाईम्स सक्रिय करतात आणि शरीरातील घातक घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात.
बिटाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढते. तो शरीरात फॅट साचू देत नाही आणि लिव्हरवरील ताण कमी करतो. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे हा शरीराची आतून स्वच्छता करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो. यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या लिव्हरमध्ये साचलेले विषारी घटक शोषून घेऊन ते शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे लिव्हर दीर्घकाळ निरोगी राहतो. मात्र लिव्हरची काळजी घेताना काही चुकीच्या सवयी टाळणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.