Marathi Actor Death: ज्येष्ठ अभिनेते बाळकृष्ण (बाळ) कर्वे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि मालिका विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० रोजी झाला. नुकताच त्यांनी आपला ९५ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर केवळ तीन दिवसांतच, आज, २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी पार्लेमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दिली.
बाळ कर्वे यांनी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून तब्बल ३२ वर्षं सेवा केली. मात्र अभिनयावरील प्रचंड प्रेमामुळे त्यांनी नोकरीसोबत नाट्यक्षेत्रात सातत्याने काम केले.
रंगभूमीवर त्यांची ओळख विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या नाट्यसंस्थेशी जोडली गेली. “रथचक्र”, “तांदूळ निवडता निवडता”, “मनोमनी”, “आई रिटायर होते”, “कुसुम मनोहर लेले” यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयशैलीतला सहजपणा आणि मार्मिक विनोदबुद्धी यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले.
त्यांचा सर्वाधिक गाजलेला अभिनय म्हणजे १९७९ साली प्रसारित झालेल्या “चिमणराव” या मालिकेतील त्यांनी साकारलेली गुंड्याभाऊ ही भूमिका. ही भूमिका मूळतः केवळ तलवलकर हे साकारणार होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितमुळे ती भूमिका बाळ कर्वे यांनी मिळाली. त्यांचा अभिनयामुळे आजपर्यंत लोक त्यांना “गुंड्याभाऊ” या नावानेच ओळखतात.
फक्त प्रौढ नाटकच नाही, तर बालनाट्याचीही त्यांना प्रचंड ओढ होती. त्यामुळेच त्यांनी ‘किलबिल बालरंगमंच’ ही संस्था उभारली आणि मुलांसाठी दर्जेदार नाटकं रंगभूमीवर आणली. बाळ कर्वे हे अत्यंत साधे, शांत स्वभावाचे तितकेच आदरणीय व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राने एक प्रामाणिक, बहुआयामी कलाकार गमावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.