दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर भारतीय शेअर बाजारात आज विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडत आहे. भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगला विशेष महत्त्व असून या परंपरेनुसार गुंतवणूकदार नवीन वर्षाची सुरुवात शेअर्सच्या खरेदी-विक्रीने करतात. मुहूर्त ट्रेडिंग सत्राला सुरूवात झाली असून यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ३० संवेदनशील निर्देशांकांचा समावेश असलेला सेन्सेक्स दिवाळीच्या दिवशी ८१,२९९.३४ अंकांवर वधारून उघडला. तर निप्टी २५,०७०.४५ च्या वर अंकांवर वधारली.
गेल्या ८ मुहूर्त ट्रेडिंग सत्रांमध्ये देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी अनुभवायला मिळाली आणि आज देखील शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्सवर सन फार्मा आणि टाटा स्टीलच्या शेअर्सनी २ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दरम्यान, अदानी पोर्ट्स, मारुती, बीईएल आणि पॉवरग्रिडच्या शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे. ट्रेंट, इन्फोसिस, कोटक बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. जागतिक बाजारात मोठी घसरण होऊनही देशांतर्गत शेअर बाजारांनी शुक्रवारी सलग सातव्या सत्रात तेजी कायम ठेवली. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. आज सेन्सेक्स १,७१८ अंकांनी वधारला, तर निफ्टीने पुन्हा एकदा २५,००० चा टप्पा ओलांडला.
महत्वाचे म्हणजे, दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या सुधारलेल्या आर्थिक निकालांमुळे आणि रुपयाच्या मजबुतीमुळे बाजारातील सकारात्मक भावनांनाही आधार मिळाला. त्यासोबत शेअर बाजारात दिवाळीचा चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. ३० शेअर्स असलेला बीएसईचा बेंचमार्क सेन्सेक्स १,७१८.०१ अंकांनी, म्हणजेच २.१७ टक्क्यांनी वाढून ८१,०२८.०२ च्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. एनएसईचा ५०-शेअर बेंचमार्क निफ्टी देखील ४९३.७५ अंकांनी, म्हणजेच २.०१ टक्क्यांनी वधारून दिवसभरातील उच्चांकी पातळी २५,०३०.३५ वर बंद झाला ही गेल्या नऊ महिन्यांतील त्याची सर्वोच्च पातळी आहे. सेन्सेक्समधील शेअर्समध्ये आज महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर ६.१५ टक्क्यांनी वाढून सर्वाधिक नफा मिळवणारा शेअर ठरला.
दरम्यान, मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी प्री-ओपन सत्राला सुरुवात होणार असून, दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून प्रत्यक्ष मुहूर्त ट्रेडिंग सुरू होईल. हे विशेष ट्रेडिंग सत्र दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.
ब्लॉक डील : दुपारी १:५० ते २:०५ वाजता
प्री-ओपन : दुपारी २:०५ ते २:२० वाजता
मुहूर्त ट्रेडिंग : दुपारी २:२० ते ३:३० वाजता
पोस्ट-क्लोजिंग : दुपारी ३:५० ते ४:०० वाजता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.