उत्तर प्रदेश सरकारने पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करत शुक्रवारी तब्बल 30 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक ADG दर्जाच्या सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मोहित अग्रवाल, पीयूष मोर्डीया, रमित शर्मा, प्रवीण कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहे.
वाराणसीचे पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांची प्रयागराजच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पीयूष मोर्डिया यांची जागा घेतली आहे. तर पीयूष मोर्डिया यांची ADG पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बरेली झोनचे ADG रमित शर्मा यांची लखनऊ झोनच्या ADG पदी बदली करण्यात आली आहे. तर लखनऊ झोनच्या ADG प्रवीण कुमार यांची बरेली झोनच्या ADG पदी नियुक्ती झाली आहे. आग्रा झोनचे ADG एस.के. भगत यांची लखनऊला बदली करण्यात आली आहे. तर ADG पदावर कार्यरत असलेले प्रशांत कुमार यांची आग्रा झोनच्या ADG पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये गौतम बुद्ध नगर (नोएडा) आणि गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांची अदलाबदल करण्यात आली आहे. नोएडाच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांची गाझियाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर गाझियाबादचे पोलीस आयुक्त जे. रविंदर गौड यांची नोएडाच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. लक्ष्मी सिंह 30 नोव्हेंबर 2022 पासून नोएडाच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांचा नोएडातील कार्यकाळ 3 वर्षे, 11 महिने आणि 28 दिवसांचा राहिला.
जे. रविंदर गौड यांची 15 एप्रिल 2025 रोजी गाझियाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांनी गोरखपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक (IG) म्हणून काम पाहिले होते. तसेच लखनऊ, मेरठ, मुरादाबाद आणि अलीगढ येथे पोलीस अधीक्षक (SP) म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. लखनऊ रेंजचे IG किरण एस. यांची वाराणसीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच तांत्रिक सेवा विभागाचे DIG आशीष तिवारी यांची सहारनपूर रेंजच्या DIG पदी बदली झाली आहे. अयोध्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) गौरव ग्रोवर यांची मुरादाबादच्या SSP पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुरादाबादचे SSP सतपाल यांची अयोध्याच्या SSP पदी बदली झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.