

शेअर बाजारात गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच मोठी तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स १६०० अंकांहून अधिक वाढला तर निफ्टीमध्येही ४०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. अमेरिकेतून आलेली एक मोठी बातमी आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) ३० कंपन्यांचा सेन्सेक्स बुधवारी ७७,३०१ अंकांवर बंद झाला होता. गुरुवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली. अवघ्या काही सेकंदांत सेन्सेक्स १,६२१ अंकांनी वाढून ७८,९२२ अंकांवर पोहोचला.
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) ५० कंपन्यांचा निफ्टीही तेजीत होता. बुधवारी निफ्टी २३,९६० अंकांवर बंद झाला होता. गुरुवारी बाजार उघडल्यानंतर निफ्टीने ४३२ अंकांची वाढ नोंदवत २४,३९२ अंकांची पातळी गाठली.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत (Midterm Election) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही ठिकाणी बहुमत मिळवलं आहे. प्रतिनिधी सभागृहातील सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने २२८ जागा जिंकल्या तर रिपब्लिकन पक्षाला १३९ जागांवर समाधान मानावं लागलं. प्रतिनिधी सभागृहात बहुमत मिळवण्यासाठी २१८ जागांची आवश्यकता असते.
ट्रम्प यांच्या पक्षाला बसलेल्या या धक्क्याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावरही दिसून आला. अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. डाऊ जोन्समध्ये मोठी वाढ झाली.
अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवाची बातमी समोर आल्यानंतर कच्च्या तेलाचे दर जवळपास १० टक्क्यांनी खाली आले.
भारतासारखे अनेक देश कच्च्या तेलाची आयात करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी झाल्यास या देशांना दिलासा मिळू शकतो. तेल स्वस्त झाल्यामुळे महागाई वाढण्याचा धोकाही कमी होण्याची शक्यता आहे. याच सकारात्मक वातावरणाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला.
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी तेजी येण्याचे संकेत आधीच मिळाले होते. गिफ्ट निफ्टीमध्ये (Gift Nifty) सुरुवातीच्या व्यवहारात ३२४ अंकांची वाढ झाली होती. गिफ्ट निफ्टी हा भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कशी होऊ शकते, याचा अंदाज देणारा महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे बाजार उघडण्यापूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि परदेशातील शेअर बाजारांमधील तेजी या सगळ्याचा फायदा भारतीय बाजाराला झाला.
केवळ भारतीय शेअर बाजारातच नाही, तर इतर आशियाई बाजारांमध्येही तेजी पाहायला मिळाली. हाँगकाँग आणि ब्रिटनच्या शेअर बाजारातही मोठी वाढ नोंदवण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.