

बिहारमधील नवादा जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका जखमी व्यक्तीच्या डोक्यावर टाके घालण्याऐवजी साध्या कागदांना जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेपलर पिनचा वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीये. एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखम खोल असल्यामुळे त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. वेदना आणि रक्तस्त्राव वाढत असल्याने तो तातडीने उपचारासाठी गावातीलच एका डॉक्टरकडे गेला.
जखमी व्यक्तीला अपेक्षा होती की, डॉक्टर जखम स्वच्छ करून त्यावर टाके घालतील आणि योग्य उपचार करतील. मात्र डॉक्टरांनी टाके घालण्याऐवजी साधे स्टेप्लर वापरून जखमेवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांनाही आश्चर्य वाटलंय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जखमी व्यक्तीच्या डोक्यावर तीन स्टेपलर पिना दिसून येतायत. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती जेव्हा त्याला विचारतो की, हे कसं झालं, तेव्हा जखमी व्यक्ती सांगतो की, दुखापत झाल्यानंतर तो गावातील एका डॉक्टरकडे गेला होता आणि तिथेच अशा प्रकारे त्याच्यावर उपचार करण्यात आले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहीजण हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचं म्हणतायत. तर काहींच्या मते ग्रामीण भागात योग्य वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे अशा घटना घडतात. अशा जखमांवर उपचार करताना जखम व्यवस्थित स्वच्छ करून त्यावर टाके घातले जातात. जेणेकरून जखम नीट भरून येईल आणि संसर्गाचा धोका कमी होईल.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची सत्यता तपासून योग्य कारवाई करावी, अशी मागणी अनेकांनी केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.