टोपली, पाटीमध्ये मासळी घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या मच्छिविक्रेत्यांकडून मासे घेताय? तेच मासे चवीचवीनं खाताय, पण ते मासे खाण्याआधी हा व्हिडिओ बघा. ही मासळी खरेदी करताना दहा काय शंभर वेळा विचार कराल! एक मच्छीविक्रेती महिला बोंबलाला आर्टिफिशियल रंग लावतेय. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुरमई, पापलेट, कोळंबी, रावस, बांगडा, बोंबिल....आहाहा.... या माशांची नावं जरी घेतली ना तरी नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणीच सुटतं राव. समुद्रातील ही मासळी खाताना थोडी काळजी घ्यावी लागेल बाबा....कारण काही मच्छीविक्रेते चविष्ट मासे विकण्याऐवजी आर्टिफिशियल कलर करून त्याची चढ्या दराने विक्री करत असल्याचं एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.
मुंबईत ससून डॉक, भाऊचा धक्का यांसह तीन - चार ठिकाणी माशांचा लिलाव होतो. मग आजूबाजूच्या उपनगरांतील मच्छीविक्रेते ही मासळी स्वस्त दरात खरेदी करते. हीच मासळी आसपासच्या शहरांत विकतात. मग ती चढ्या दराने विकली जाते. हीच मासळी आपण विकत घेतो. ती चवीचवीनं खातो. पण ही मासळी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न एका व्हायरल व्हिडिओमुळं उपस्थित होऊ लागला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली- विरार या दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. मच्छीविक्रेती महिला अगदी राजरोसपणे इतर प्रवाशांसमोरच बोंबलाला लाल रंग लावत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बोरिवली - विरार लोकल ट्रेनमधला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मासळी विक्री करणारी महिला बोंबलाची पाटी घेऊन ट्रेनमधून प्रवास करत आहे. पण या प्रवासात ती बोंबलांना आर्टिफिशियल कलर लावत आहे. कधी कधी मासळी ताजी नसते. बरेच तास उलटून गेलेले असतात. ते सुकतात, दिसतानाच ते खराब दिसतात. मग गिऱ्हाईक ते खरेदी करताना नाक मुरडतात. अशावेळी ही मासळी ताजी वाटावी म्हणून कदाचित असा प्रकार करत असावेत, असे बोलले जात आहे. तर लाल तोंडाचे बोंबिल चवीला लय भारी असतात, असं सांगितलं जातं. कदाचित याचमुळे ही विक्रेती महिला बोंबलांना लाल रंग लावत असावी, असा कयास लावला जात आहे. पण तथ्य काय हे कुणालाही ठाऊक नसावं, असे काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
अलीकडच्या काळात दूध, पनीर, विविध प्रकारचे मसाले, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आदींमध्ये भेसळ असल्याच्या आणि संबंधित आस्थापनांवर कारवाया झाल्याचे आपण सर्वांनीच बघितले आहे. सगळीकडेच भेसळ सुरू आहे, मग माणसानं जगण्यासाठी खायचं काय, असा प्रश्न पडत आहे. मासे हे समुद्र, नदी, धरणे, तलाव आदी ठिकाणी मिळतात. किमान मासळीत भेसळ नसावी असा जो आजपर्यंतचा समज होता, तो या व्हायरल व्हिडिओमुळं पुरता दूर झाला असावा....हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मात्र या व्हिडिओची सत्यता, महिलेची ओळख आणि वापरण्यात आलेल्या नेमक्या पदार्थाची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.