

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अंडर १९ संघातील क्रिकेटपटू रोहित यादव याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयाबाबत कथितपणे चुकीची माहिती दिल्याच्या प्रकरणात बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. रोहितची आगामी मालिकेसाठी अंडर १९ संघातही निवड झाली होती.
फिरकीपटू असलेला रोहित यादव (Rohit Yadav Banned) याची काही आठवड्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या अंडर १९ संघात निवड करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या रोहित यादव यानं जुलैमध्ये भारताच्या अंडर १९ संघासोबत श्रीलंकेचा दौरा केला होता. तेथे त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. अखेरच्या कसोटी सामन्यात सहा विकेट घेऊन भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, रोहित यादव याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघाविरोधात या महिन्याच्या अखेरीस राजकोट आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या मालिकेसाठी रोहितची भारताच्या संघात निवड करण्यात आली होती.
श्रीलंका दौऱ्यात कागदपत्रांच्या तपासणीवेळी रोहितच्या वयात विसंगती दिसून आली होती. रोहितकडे तीन वेगवेगळे जन्मदाखले आढळून आले. त्यात २००७, २००९ आणि २०१० अशा जन्मवर्षांचा उल्लेख होता. याशिवाय त्याच्या आधार कार्ड नोंदीत वेगवेगळे जन्मवर्ष दिसून आले. बंगाल क्रिकेट संघात त्याचं जन्मवर्ष २००७ म्हणून नोंद करण्यात आले होते. तर आधार कार्डावरील नोंदीत २०१७ आणि २०२० च्या अपडेटनुसार, सन २००६ आणि २०२१ मध्ये बदलून २००९ करण्यात आल्याचे दिसून आले. या नोंदीनुसार, त्यात वयात विसंगती आढळून आली आणि वयोगटाच्या क्रिकेट संघात खेळण्यासाठी तो अपात्र असल्याचे समोर आले.
यामुळे सीएबीने सर्वात आधी रोहितला आपल्या ज्युनिअर संघांतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर यासंदर्भात बीसीसीआयला ही माहिती दिली होती, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय बीसीसीआयने आता त्याला दोन वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास बंदी घातली असून, सर्व संलग्न राज्य क्रिकेट संघांना याबाबतची माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.