

गिरिश निकम, साम टीव्ही
भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकल्याने सर्वत्र खेळाडूंचं कौतुक होतंय. साहजिकच आहे. आता जो वुमन्स टीमचा वृक्ष बहरलाय त्याच्या 70 च्या दशकातील मुळांना मात्र सगळेजण विसरलेत. या वृक्षाच बीज ज्यांनी रोवले ते अॅड नरेंद्र निकम यांची पुण्यात एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण सिद्धये आणि सुरेश ढुमके हे माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू पण होते. प्रवीण सिधये यांचे वडील यशवंत उर्फ बाबा सिधये हे भारताचे पहिले मूकबधिर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते. 1949 ते 1966 दरम्यान खेळले. 51 सामन्यात 1862 धावा केल्या आहेत.
प्रसिद्ध 'इक्बाल' सिनेमा त्यांच्या संघर्षावर आधारित आहे. पण त्याचं श्रेय मिळालं नाही अशी प्रवीण सिधये यांची तक्रार आहे. यावेळी गप्पांमध्ये महिला क्रिकेटच्या संघर्षाचा पट उलगडला. नवीन पिढीला हे माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून श्री निकम यांच्या भेटीच्या निमित्ताने थोडक्यात प्रकाश टाकलाय.
श्री निकम यांचं मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील धामपूर-मोगरणे वाडी आहे. पुण्यात ते स्थायिक झालेत. निकम यांनी 70च्या दशकात महिला क्रिकेट संघ तयार करण्यासाठी आणि स्पर्धा भरवण्यासाठी खूप खस्त्या खाल्ल्या. मोठी कसरत करुन महिला क्रिकेटचे सामने भरवलेत. ज्यावेळी महिला क्रिकेट दुर्लक्षित होतं. त्या काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोठे परीश्रम घेतले. निधीसाठी वणवण फिरले. महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघटनेचे (MSWCA) संस्थापक सदस्य दिलीप चिंचोरे, मधुकर तापिकर, सुरेश शिंदे, राजेंद्र देशपांडे, आनंद गानू, अनंता मते, सुरेश अग्रवाल तसेच माजी रणजी खेळाडू आणि 40 वर्षं प्रशिक्षक राहिलेले सुरेश ढुमके यांचीही त्यांना खूप मदत झाली.
त्याशिवाय राजकीय क्षेत्रातून माजी वित्त आणि सहकार मंत्री कै. यशवंतराव मोहिते, तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, कै. जयबाई यशवंतराव मोहिते. बँक ऑफ महाराष्ट्रचे तत्कालीन जनरल मॅनेजर कै. वसंतराव पाडगावकर यांनीही मदत मदतीचा हात पुढे केला. त्यावेळच्या नेत्यांच्या गाठीभेटी, अनेक प्रसंग निकम यांच्या तोडूनच ऐकण्यासारखे आहेत.
तरुण वयात संघटन कौशल्य
निकम यांनी 1973 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी पहिली राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. त्यावेळी तीन संघांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र, मुंबई आणि उत्तर प्रदेश संघ होते.
उत्तर प्रदेश संघात 6 खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्र संघाने 6 खेळाडू उतरवले. इंडियन एक्सप्रेसने टीका केली होती
महिला क्रिकेट राष्ट्रीय स्पर्धेत 2 आणि 1/2 संघांनी भाग घेतला.
तथापि, डिसेंबर 1974 मध्ये वाराणसी येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत भारतातील 18 राज्य संघांनी भाग घेतला.
वयाच्या 22 व्या वर्षात नरेंद्र निकम संघटन सचिव होते. पहिला ऐतिहासिक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होता. पुण्यात हा महिला क्रिकेटचा 3 दिवसांचा कसोटी सामना अतिशय यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.
संघटनेची स्थापना
महाराष्ट्र महिला क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा संघटनेच्या अध्यक्षा होण्यासाठी निकम यांनी तत्कालीन खासदार प्रेमला (काकी) चव्हाण (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई) यांना गळ घातली. नरेंद्र निकम संघटनेचे सेक्रेटरी होते. 1973 मध्ये पुण्यात राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाच्या कॅप्टन उज्वला निकम-पवार होत्या. त्या नरेंद्र निकम यांच्या बहिण आहेत. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर महिला खेळाडू सराव करायच्या. तत्कालीन खासदार संभाजीराव काकडे आणि त्यांच्या पत्नी कंठावती यांनी प्रशिक्षण सुविधेचे उद्घाटन केले. कंठावती काकडे काही खेळाडूंच्या घरी गेल्या. ज्या कुटुंबांनी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली नव्हती त्या पालकांना मुलींना सरावासाठी पाठवण्यास भाग पाडले.
नरेंद्र निकम यांनी 2008 पर्यंत महिला क्रिकेटसाठी परीश्रम घेतले. खरंतर MCA किंवा BCCI ने अशा व्यक्तिंचा यथोचित गौरव केला पाहिजे.
खासदारांचे जावई, 'वर्षा'वर लग्न
निकम पुणे जिल्ह्याचे माजी सरकारी वकील आहेत. आणखी एक खास ओळख म्हणजे भारतीय जनसंघाचे महाराष्ट्राचे पहिले आमदार आणि खासदार स्वर्गीय नानासाहेब उत्तमराव पाटील यांचे ते जावई आहेत. माजी उपमुख्यमंत्री राहिलेले उत्तमराव पाटील हे चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र होते. नरेंद्र निकम यांचं लग्न मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालं होतं. 70 पेक्षा जास्त वय असूनही निकम यांचा उत्साह त्यांचा फिटनेस कमालीचा आहे. खरंतर नरेंद्र निकम हे माझेही नातेवाईक आहेत. पत्नीच्या नात्याकडून मामेसासरे लागतात. त्यांची आणि माझी प्रथमच भेट झाली. मात्र जणूकाही खूप वर्षांची ओळख असल्यासारखं वाटलं. क्रिकेट आणि राजकारणातलेही अनेक किस्से नरेंद्र निकम यांच्याकडे आहेत. पुन्हा भेटण्याचं ठरवून या सत्तरीतल्या तरुणाचा मी निरोप घेतला.
पुण्यामध्ये नेहरू स्टेडियमवर 1975 मध्ये 7, 8, 9 फेब्रुवारी रोजी पहिला भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये तीन दिवसांचा कसोटी सामना झाला. त्यावेळी तत्कालीन क्रीडामंत्री आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शेषराव वानखेडे यांना ऑस्ट्रेलियन कॅप्टन सिसिलिया विल्सन खेळाडूंची ओळख करून देताना दिसत आहे. सोबत सामना समितीचे अध्यक्ष आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालीन जनरल मॅनेजर वसंतराव पाडगावकर आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी नरेंद्र निकम
या सामन्याच्या कर्णधार उज्वला निकम (पवार) होत्या. त्यांनी तीन बळी घेतले होते. ऑस्ट्रेलिया कडून सर्वाधिक 97 धावा लिंडा स्मिथने केल्या. स्मिथचा बळी उज्वलाने घेतला.हा सामना भारतीय महिला क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी सुरुवात करणारा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या महिला टीम बरोबर एकूण तीन कसोटी सामने झाले. पुणे, दिल्ली आणि कोलकत्ता येथे सामने झाले.
दिल्लीतल्या महिला टीमची कर्णधार सुधा शहा होत्या. हे तिन्ही सामने अनिर्णित राहिले होते. एकूण आठ सामने खेळलेल्या उज्वला निकम (पवार) या आता 67 वर्षांच्या आहेत. त्यावेळी महिला क्रिकेट खूप दुर्लक्षित होतं. खूप संघर्षाचे वातावरण होतं. महिला क्रिकेट संघटनेचा खूप फायदा झाला अस आवर्जून उज्वला पवार यांनी सांगितलं. आता मात्र खूप बदल झालेला आहे. क्रिकेट मध्ये पैसे आले आहेत. क्रिकेट खेळण्याचा शारीरिक आणि मानसिक कणखरतेसाठी खूप फायदा झाला, असे उज्वला पवार यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.