

आयपीएलचा 'महाकुंभ' आज, शनिवारपासून सुरू होत आहे. बेंगळुरूत आरसीबी विरुद्ध एसआरएच (RCB vs SRH) यांच्यात सलामीची लढत होत आहे. याच स्पर्धेचा दुसरा सामना पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ आणि तिनदा ट्रॉफीवर नाव कोरलेला कोलकाता नाइट रायडर्स संघात होणार आहे. हा सामना थरारक होईल अशी अपेक्षा असताना, मुंबई इंडियन्सला तगडा झटका लागला आहे. मीडिया वृत्तानुसार, टी २० वर्ल्डकप स्पर्धेत संघाला फायनलमध्ये पोहोचवणारा 'कॅप्टन' मिचेल सँटनर आणि अष्टपैलू विल जॅक्स हे दोघे सुरुवातीचा सामना खेळू शकणार नाहीत.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि अन्य दोन प्रमुख खेळाडू आगामी सामन्यांच्या काही दिवस आधीच वानखेडे मैदानात संघासाठी आयोजित सत्रात सहभागी झाले नव्हते. मिचेल सँटनर यानं अलीकडेच टी २० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड संघाचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात संघ फायनलमध्ये पोहोचला होता. तर त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी २० मालिकेतही तो खेळला होता. सुरुवातीचे तीन सामने खेळल्यानंतर उर्वरित दोन सामन्यांत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तो लवकरच मुंबई इंडियन्स संघात सहभागी होईल. मात्र, तो संघात सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहोचला की नाही याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.
विल जॅक्स हा वैयक्तिक कारणांमुळं मुंबई इंडियन्स संघासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही किंवा तो विलंबाने संघात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये विल जॅक्सची कामगिरी जबरदस्त होती. इंग्लंडला सेमिफायनलमध्ये पोहोचवण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. भारताविरुद्ध झालेल्या सेमिफायनलच्या सामन्यात खेळल्यानंतर तो चार्टर विमानानं इंग्लंडकडे रवाना झाला होता. सँटनर आणि विल जॅक्स हे दोघेही भारतात आले की नाहीत, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई आणि कोलकाता संघात रविवारी सामना होत आहे. त्याआधी वानखेडे मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी सराव केला. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वात आधी नेट्सचा ताबा घेतला. स्ट्राइक घेऊन एका तासापेक्षा जास्त वेळ फलंदाजी केली. विशेषतः वेगवान गोलंदाजीला तो सामोरे गेला. शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्या यानं गोलंदाजी केली. त्यात त्यांनी शॉर्ट पिच चेंडू फेकले. हार्दिकने तर तासभर गोलंदाजीचा सराव केला. त्यानंतर बॅटिंग केली. ट्रेनिंगच्या अखेरच्या टप्प्यात गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा याच्या उपस्थितीत मुंबईचे वेगवान गोलंदाज दीपक चाहर, अश्विनी कुमार आणि मोहम्मद इजहार यांनी गोलंदाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.