भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव केला
भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या क्रिकेट अंतिम फेरीत प्रवेश
आता ३ ऑक्टोबरला सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये टीम इंडियाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल १२४ रन्सनी पराभव करत सुवर्णपदकाच्या सामन्यात धडक मारली. आता ३ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुवर्णपदकासाठी महामुकाबला रंगणार आहे. या मुकाबल्याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
या सामन्यात भारताने बॅटिंग करताना २० ओवरमध्ये १६९ रन्स काढले तर, ७ खेळाडू आउट झाले. सुरुवातीला भारताची सुरुवात अडखळत झाली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी ७ रन्स केले, तर तिलक वर्माला केवळ २ रन्स काढता आले. अक्षर पटेल ८, शिवम दुबे ३ आणि कर्णधार श्रेयस अय्यर १३ रन्सवर बाद झाले. अशा कठीण परिस्थितीत ईशान किशनने आपली दमदार बॅटिंग करत डाव सावरला आणि पुढे जे घडलं त्याने क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ईशान किशनने दमदार बॅटिंग करत ८० रन्स काढून तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याला वैभव सूर्यवंशीने चांगली साथ दिली. सूर्यवंशीने २१ बॉलमध्ये ३८ रन्स करताना ६ चौकार आणि २ षटकार लगावले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर १७० रन्सचे आव्हान उभे केले.
मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंसमोर अक्षरशः दाणादाण उडाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात श्रीलंकेला दोन मोठे धक्के दिले. बुमराहच्या खेळीने सिनेथ जयवर्धने आणि सोहन डी लिवेरा यांना ओपनिंगही करता आली नाही. यानंतर अक्षर पटेलनेही आपल्या ओवरमध्ये पहिल्याच बॉलवर नुवानिंदू फर्नांडोला बाद करत श्रीलंकेची अवस्था आणखी बिकट केली. त्यानंतर अक्षरने एकाच ओवरमध्ये साहन अराचिगे आणि अशेन बंदारा यांना बाद करत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारताने अवघ्या १८ रन्समध्येच श्रीलंकेच्या ५ विकेट काढल्या होत्या. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेला सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही. अखेर भारताने श्रीलंकेचा १२४ रान्सनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत आपले नाव कोरले. आता अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबरचा भारत-पाकिस्तान सामना क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.