

पश्चिम बंगालमधील विजय भारतीय जनता पक्षासाठी आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हे यावरून स्पष्ट होते की, ज्यावेळी ते सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देण्यासाठी मंचावर आले, तेव्हा त्यांनी उपस्थित असलेल्या माखनलाल सरकार यांचा सन्मान केला.
पंतप्रधानांनी कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवरील मंचावर माखनलाल यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी त्यांना मिठी मारली. या वेळी पंतप्रधान मोदी आणि माखनलाल सरकार यांच्यासह उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
आज भाजपने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये त्याचं सरकार स्थापन केलं. यावेळी भाजपने ९८ वर्षीय ज्येष्ठ नेत्याला ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात व्यासपीठावर स्थान देऊन सन्मानित केले.
माखनलाल सरकार हे राष्ट्रवादी चळवळीशी संबंधित असलेल्या सुरुवातीच्या तळागाळातील नेत्यांपैकी एक आहेत. १९५२ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनादरम्यान श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबतच्या सहभागामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. या काळात ते तुरुंगात होते.
१९८० मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर ते पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांचे समन्वयक बनले. केवळ एका वर्षात त्यांनी पक्षामध्ये जवळपास १०,००० सदस्य नोंदणी करण्यास मदत केली. त्यांनी १९८१ पासून सलग सात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
यापूर्वी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत सभेत दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. 'जय श्री राम'च्या घोषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेच्या ठिकाणी आले होते.
पंतप्रधान सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि तेथून ते हेलिकॉप्टरने रेस कोर्स मैदानावर पोहोचले. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच हजारो भाजप समर्थक ब्रिगेड परेड मैदानावर जमले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.