

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
टीएमसी नेत्यासह ५ जणांना पोलिसांकडून अटक
विजय मिरवणुकीदरम्यान हल्ला झाल्याचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी टीएमसीच्या नेत्यासह ५ जणांना अटक केली. विजयानंतर भाजपने काढलेल्या विजय मिरवणुकीवर टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला करत भाजप कार्यकर्त्याची हत्या केली होती. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव चांगलाच वाढला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत टीएमसी नेत्यासह ५ जणांना अटक केली. मंगळवारी रात्री भाजपने टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे. याचा व्हिडीओ देखील टीएमसीने सोशल मीडियावर पोस्ट केला.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला आहे. मंगळवारी रात्री कोलकाताच्या न्यू मार्केटमधील टीएमसी पक्षाचे कार्यालयावर बुलडोझर फिरवण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मार्केटमधील इतर दुकानांची देखील तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत टीएमसीने सोशल मीडियावर लिहिले की, 'भाजपने बदला घेतला. हीच भाजपची गुंडगिरी आहे.'
निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला. राज्यात गेल्या २४ तासांत चार जणांची हत्या करण्यात आली. यामध्ये भाजप आणि टीएमसीच्या प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. उत्तर २४ परगणा आणि हावडा येथे टीएमसीने आपल्या दोन कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. कोलकाता आणि बीरभूम येथे भाजप समर्थकांनी आपल्या पक्षाच्या दोन सदस्यांची हत्या केल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.
निवडणूक निकालानंतर कोलकातामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान, त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचे निवासस्थान आणि टीएमसी मुख्यालय येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे. बुधवारी या तिन्ही ठिकाणी एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. ममता यांच्या निवासस्थानाबाहेरील बॅरिकेड्स देखील हटवण्यात आले आहेत. अभिषेक हे डायमंड हार्बर मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांची 'झेड' श्रेणीची सुरक्षा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.