

हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर आरक्षण मिळणार नाही
सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाबाबत मोठा निर्णय
तामिळनाडू सरकारचा मुस्लिम आरक्षणासंबंधी आदेश कोर्टाने केला रद्द
सुप्रीम कोर्टाने आज आरक्षणाबाबत एक महत्वपूर्ण निकाल दिला. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारणारी व्यक्ती फक्त धर्मांतराच्या आधारावर मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा दावा करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाचा निर्णय कामय ठेवला. मद्रास हायकोर्टाने तामिळनाडू सरकारच्या धर्मांतराबाबतच्या आदेशाला रद्द केले होते. ज्यामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतरही मागासवर्गीय, अतिमागासवर्गीय आणि अनुसूचित जातीतील लोकांना मागासवर्गीय मुस्लिम प्रवर्गात समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती.
हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्ती ओबीसी आरक्षणासाठी पात्र असतील की नाही? याबाबत तामिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोर्टाने सांगितले की, हिंदू सामाजिक व्यवस्थेतील मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातीतील व्यक्ती दुसऱ्या धर्मात धर्मांतर केल्यानंतर आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. कोर्टाने पुढे असेही सांगितले की, धर्मांतरानंतर एखाद्या व्यक्तीचा सामाजिक मागासलेपणा हिंदू सामाजिक व्यवस्थेतून गैर-हिंदू सामाजिक व्यवस्थेत हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.
आरक्षणाबाबतच्या या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. मद्रास हायकोर्टाने मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेण्याची परवानगी देणारा तामिळनाडू सरकारचा निर्णय रद्द केला होता. तामिळनाडूमधील धर्मांतरानंतर मागासवर्गीय दर्जा देण्याशी संबंधित या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाची आता चर्चा होऊ लागली आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, जो व्यक्ती हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारतो. तो नंतर धर्मांतरापूर्वी ज्या सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा भाग होता. त्या वर्गाच्या कल्याणकारी लाभांवर दावा करू शकत नाही. पूर्वीच्या सामाजिक व्यवस्थेत भोगलेल्या मागासलेपणाचा उपयोग नवीन धर्मात मागासलेल्या वर्गाचा दर्जा मिळवण्यासाठी आपोआप आधार म्हणून केला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की, हिंदू, शीख, बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला अनुसुचित जातीचा सदस्य मानले जाऊ शकत नाही. या धर्मांव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्याने ती व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जातीशी निगडित अनुसूचित जातीचा दर्जा गमावते. त्यामुळे ती आरक्षणाच्या लाभांवर दावा करू शकत नाही. त्याचसोबत धर्मांतरानंतर एखादी व्यक्ती पुन्हा हिंदू धर्मात परत आल्यानंतर त्या व्यक्तीला पूर्वीचा मागासवर्गीय दर्जा आपोआप परत मिळत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.