

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात भयंकर घटना घडली
पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून ५ मुलांचा मृत्यू
उकाड्यामुळे अंघोळ करण्यासाठी गेले असता घडली घटना
मृतांमध्ये २ मुली आणि ३ मुलांचा समावेश
बिहारमध्ये ५ मुलांचा डबक्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. बुधवारी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात ही घटना घडली. पाण्याने भरलेल्या खड्यात आंघोळ करायला हे सर्वजण गेले होते. पण खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे या पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बिस्फी येथील पाटणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केरवार गावात घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरवार गावातील एका खासगी जमिनीवर जेसीबीने खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा पाण्याने भरला होता. प्रचंड उकाड्यामुळे सर्व मुले त्यात अंघोळ करायला गेली. त्यातील एक मूल खोल पाण्यात बुडू लागले आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलंही बुडाली. तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला. ही सर्व मुले एकाच गावातील रहिवासी होती. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
मृत मुलांचे वय १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान होते. त्यामध्ये दोन मुली आणि तीन मुलांचा समावेश होता. मृतांमध्ये सलोनी कुमारी (१२ वर्षे), अभिषेक (१५ वर्षे), प्रशांत (१३ वर्षे), रिंकू कुमार (१० वर्षे), स्नेहा कुमारी (१२ वर्षे) अशी मृत मुलांची नावं होती. रिंकू आणि प्रशांत हे सख्खे भावंडं होती. घटनेची माहिती मिळताच बिस्फी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी खड्ड्यातून पाचही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आणि सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मधुबनी सदर रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. गावकऱ्यांचा आरोप आहे की, जमीनमालकाने माती उपसण्यासाठी एक खड्डा खोदला. त्याची खोली १० ते १५ फूट आहे. खड्ड्याभोवती कुंपण नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यांनी जमीनमालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.