

दिल्लीच्या पीरागढी उड्डाणपुलाजवळ कारमध्ये ३ जणांचे मृतदेह आढळले
मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश
शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत
दरोड्याचा देखील संशय वाटत नाही
दिल्ली पोलिस सध्या तपास करत आहेत
दिल्लीच्या पीरागढी भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी उड्डाणपुलाजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये तिघांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. २ पुरूष आणि एका महिलेचा मृतदेह आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पीरागढी उड्डाणपुलाजवळ एक कार गेल्या अनेक तासांपासून उभी होती. काही व्यक्तींनी कारच्या आत पाहिले आणि त्याला तीन जण बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली आणि गर्दी जमली. वारंवार कारच्या काचांवर ठोठावूनही तिघेही जागे झाले नाहीत तेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गाडी अनलॉक केली. तेव्हा या तिघांचाही मृत्यू झाल्याचे आढळून आले.
तिघांच्याही शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यांच्या वस्तू शाबूत आहेत आणि दरोड्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. त्यामुळे आत्महत्या किंवा गुदमरून त्यांचा मृत्यू झाला या दृष्टिकोनातून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना विषबाधा किंवा आत्महत्या असल्याचा संशय आहे. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे खरे कारण उघड होईल. सध्या या प्रकरणात बाहेरील व्यक्तीचा सहभाग असल्याचा कोणताही संशय नाही आणि असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
कारमध्ये मृत आढळलेल्या तीन जणांपैकी एकाची ओळख पटली आहे आणि इतर दोघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकाचे वय अंदाजे ६० वर्षे आहे. एक पुरूष आणि एक महिला या दोघांचे वय अंदाजे ४० वर्षे असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले असून ते तपास करत आहेत. कारमधून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.