

सूरजकुंड जत्रेमध्ये पाळणा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली
बचावकार्य करताना पोलिस अधिकारी जगदीप प्रसाद यांचा मृत्यू झाला
१३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली. सूरजकुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जत्रेमध्ये पाळणा कोसळला. या घटनेमुळे जत्रेच एकच गोंधळ उडाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले. या दुर्घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही घटना संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास घडली. सूरजकुंड जत्रेमध्ये पाळण्यावर अनेक जण बसले होते. त्याचवेळी अचानक पाळण्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पाळण्यात बसलेल्या लोकांना विजेचा धक्का बसायला सुरूवात झाली. त्यानंतर हा पाळणा खाली कोसळला. त्यामुळे या पाळण्यामध्ये बसलेले सर्वजण खाली पडले. हा पाळणा पडल्यानंतर सर्वजण जोरजोरात ओरडू लागले. जीव वाचण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले.
या घटनेमध्ये पोलिस अधिकारी जगदीप प्रसाद यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. बचावकार्य करत असताना पाळण्याचा एक तुकडा त्यांच्या डोक्याला लागला. गंभीर जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेत १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून नजीक्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पाळण्याच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
या अपघातामुळे जत्रेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सूरजकुंड जत्रेच्या फूड कोर्टमधील एक गेट यापूर्वी जोरदार वाऱ्यामुळे कोसळले होते. अशा वारंवार घडणाऱ्या घटना जत्रेच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करत आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले की, अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि संबंधित पाळणा ऑपरेटरवर कारवाई केली जाईल. योग्य सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल याची देखील खात्री केली जाईल. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या सभोवतालचा परिसर बंद करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.