

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याचा संशयास्पद मृत्यू
संजय दास यांचा घरात आढळला मृतदेह
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह
भाजप सरकारनंतर बंगालमधील राजकीय घडामोडी
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. शुक्रवारी टीएमसीच्या ३१ नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत पक्षाला रामराम ठोकला. ही घटना ताजी असतानाच ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसला आहे. टीएमसीच्या एका बड्या नेत्याचा मृत्यू झाला. घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दमदम परिसरात दक्षिण दमदम नगरपालिकेचे तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक संजय दास यांचा मृत्यू झाला. घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
संजय दास हे राजारहाट गोपालपूर मतदारसंघाच्या माजी आमदार आणि तृणमूल नेते देबराज चक्रवर्ती यांचे जवळचे सहकारी अदिती मुन्शी यांचे पती होते. असे देखील सांगितले जात आहे की, पश्चिम बंगालमध्ये सरकार बदलल्यापासून संजय दास हे मानसिक तणावाखाली होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूमुळे तृणमूल काँग्रेसला धक्का बसला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने टीएमसीचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. भाजप नेते सुवेंदू अधिकारी राज्याचे मुख्यमंत्री झाले. तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असून ते विरोधी पक्षात बसले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागा जिंकल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागा मिळाल्या. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूलचे कार्यकर्ते बऱ्याच काळापासून संतप्त आहेत. अशातच आता तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक संजय दास यांचा मृतदेह सापडल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
अलीकडेच मुख्यमंत्री शुभेंदू यांचे एक वक्तव्यही समोर आले होते. ते म्हणाले की, 'तृणमूल काँग्रेसने आमच्या कार्यकर्त्यांवर केलेले अत्याचार मी विसरलेलो नाही. भूतकाळात झालेल्या राजकीय गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे.' पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात बुलडोझर कारवाई सुरू झाली. राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानके, हावडा आणि सियालदाह यांच्या परिसरात बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. जिथे जिथे बेकायदेशीर बांधकाम किंवा अतिक्रमण असेल तिथे बुलडोझरचा वापर केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.