

बिकानेर काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर कार्यकर्त्यांकडून हल्ला
मदन गोपाल मेघवाल यांच्यावर हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल
मदन गोपाल मेघवाल हल्ला प्रकरणात काँग्रेसची कारवाई
दीपक अरोरा आणि मोहित अरोरा काँग्रेसमधून निलंबित
काँग्रेसने दोन माजी नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित केले
राजस्थानच्या बिकानेरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बिकानेर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष मदन गोपाल मेघवाल यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्यावरील या कथित हल्ला आणि गैरवर्तनाप्रकरणी राजस्थान काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने दोन माजी नगरसेवकांवर मोठी कारवाई केली. पक्षाने दीपक अरोरा आणि मोहित अरोरा यांना काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून तात्काळ प्रभावाने ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष मदन गोपाल मेघवाल यांना स्वागत करण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांनी मदन गोपाल मेघवाल यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला. त्याचा विरोधात कारवाईची मागणी केली.
या घटनेनंतर काँग्रेसने कारवाई केली. काँग्रेसने जारी केलेल्या पत्रानुसार मेघवाल यांची तक्रार गांभीर्याने घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मुख्य आरोपी असलेल्या वडील आणि मुलाविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर भाजपने काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेस पक्षाच्या म्हणण्यानुसार, बिकानेर महानगरपालिकेच्या वॉर्ड ५० मधील प्रगाशी कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान हा कथित हल्ला आणि गैरवर्तन घडले. मदन गोपाल मेघवाल यांच्या तक्रारीच्या आधारे, पक्षाने म्हटले आहे की माजी नगरसेवक दीपक अरोरा, मोहित अरोरा आणि इतर काही जणांनी त्यांच्यावर कथितपणे हल्ला केला. जिल्हाध्यक्षांप्रति असे वर्तन पक्षशिस्तीच्या विरोधात असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
या हल्ल्यानंतर हल्ला करणाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षाने ही कारवाई राजस्थानमधील नगरपालिका निवडणुकांच्या अगदी काही दिवस आधी केली आहे. राज्यात नगरपालिका निवडणुका ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत होणार आहेत. बिकानेरमधील ही पक्षांतर्गत कारवाई निवडणुकांपूर्वी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या नागरी निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.