All party meeting Update News : आखाती देशात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतामध्येही जाणवायला लागला आहे. पुढील काही दिवस इराण-अमेरिका आणि इस्त्राइल यांच्यातील स्थिती अशीच राहिली तर भारतामध्ये गंभीर परिणाम होतील, असं संकेत मोदींनी दिले होते. देशातील सध्याच्या स्थितीची माहिती देण्यासाठी आणि पुढील तयारीसाठी मोदी सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतामधील प्रत्येक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष असल्याचे सरकारकडून विरोधकांना सांगितले, त्याशिवाय गरज पडली तर आवश्यक पावले उचलण्याची तयारी करत असल्याचेही सांगण्यात आले.
सर्वपक्षीय बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही उपस्थित होते. तारिक अन्वर, मुकुल वासनिक, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव आणि बीजेडीचे सस्मित पात्रा हे विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.
पश्चिम आशिया संकटावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. रिजिजू म्हणाले की, सर्व पक्षांना परिस्थिती समजावून सांगण्यात आली. त्याशिवाय भारतावर होत असलेल्या परिणामांवर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश होता. विरोधी पक्षांनी भारतीयांची सुरक्षा, तेल आणि वायू पुरवठा तसेच देशाच्या हितांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या सर्व प्रश्नांची आणि सूचनांची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.
सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी प्रतिक्रिया दिली. आखाती देशातील युद्धाच्या स्थितीवर सरकारकडून स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण ही बैठक असमाधानकारक होती. या विषयावर राज्यसभेच्या नियम १७० आणि लोकसभेच्या नियम १९३ अंतर्गत सविस्तर चर्चा व्हायला हवी. तरच लोकांचे समाधान होईल, अशी आमची मागणी आहे, असे तारिक अन्वर म्हणाले.
सरकार आम्हाला युद्ध नकोय असे म्हणत आहे. पण नुसतं असं बोलून काय फरक पडतो? परिस्थिती वेगळी आहे, तिथे आधीच युद्ध सुरू झाले आहे, असे तारिक अन्वर म्हणाले. पाकिस्तान आपल्यापेक्षा लहान देश आहे, तो प्रत्येक बाबतीत कमकुवत आहे. पण आज मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये भूमिका बजावत आहेत. मात्र, आपण फक्त शांतपणे सर्वकाही बघत आहोत, असेही ते म्हणाले.
इराण संघर्षात पाकिस्तानकडून मध्यस्थीची भूमिका घेतल्यानंतर यावर देशात चर्चा सुरू झाली आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांना ते म्हणाले की, भारत स्वतःला पाकिस्तानसारखा 'दलाल' मानत नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करण्याचे प्रयत्न पाकिस्तान, तुर्कीसह अनेक देशांनी तीव्र केले असतानाच ही वक्तव्ये आली आहेत.या प्रकरणात पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये काहीही नवीन नाही, कारण १९८१ पासून अमेरिकेकडून त्या देशाचा 'वापर' केला जात आहे, असे एस. जयशंकर यांनी म्हटल्याचे पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.