PM Modi IIT Delhi: ‘जो शिकत राहील तोच जिंकेल’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना PM मोदींनी दिला यशाचा खास मंत्र

IIT Delhi convocation: IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात PM मोदींनी विद्यार्थ्यांना सतत शिकत राहण्याचा, योग्य प्रश्न विचारण्याचा आणि मोठी आव्हानं छोट्या टप्प्यांत विभागून सोडवण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी ‘परम प्रज्ञा’ AI सुपरकंप्युटिंग सेंटरचं उद्घाटनही केलं.
PM Modi IIT Delhi
PM Modi IIT Delhisaam tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेत. यावेळी त्यांनी पदवी मिळवणाऱ्या 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये ‘परम प्रज्ञा’ या एआयवर आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकंप्युटिंग सेंटरचं उद्घाटन केलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, IIT दिल्लीमध्ये येणं हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. आज विद्यार्थी केवळ हातात पदवी घेऊन संस्थेतून बाहेर पडत नाहीत, तर देशासाठी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न घेऊन पुढे जातायत. देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. IIT दिल्लीसारख्या संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर केवळ करिअर घडवण्याची संधी नाही, तर देशासाठी काहीतरी योगदान देण्याचीही मोठी संधी आहे, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून दिला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचाही उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, आज तुमच्या यशामुळे तुमच्या कुटुंबीयांना जसा अभिमान वाटतोय तसाच अभिमान मला देखील तुमच्याबद्दल वाटत आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी पदकं मिळाली आहेत. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मात्र पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी काही मुली असत्या तर आणखी चांगलं वाटलं असतं. फक्त एक-दोन मुली का? आणखी मुली असायला हव्यात, असंही मोदी म्हणाले.

PM Modi IIT Delhi
मोठी बातमी! शरद पवारांचे खासदार मोदींची भेट घेणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘ओरिएंटेशनपासून दीक्षांत समारंभापर्यंतचा प्रवास पूर्ण केल्याचं समाधान’

विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मनात सध्या अनेक विचार सुरू असतील, असं म्हटलं. हलक्याफुलक्या अंदाजात ते म्हणाले, “मी बाबा बागेश्वर नाही, पण काही ना काही विचार सुरू असतील.” प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या येणाऱ्या काळाचं एक चित्र असतं, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या IIT दिल्लीतील पहिल्या दिवसापासून ते दीक्षांत समारंभापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला. ओरिएंटेशनपासून कन्वोकेशनपर्यंतचा हा प्रवास पूर्ण केल्यानंतर आज विद्यार्थ्यांच्या मनात समाधानाची भावना असेल, असं मोदी म्हणाले.

‘कॅम्पस लाइफ कायम आठवेल’

IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण कायम राहील, असं मोदी यांनी सांगितलं. आयुष्यात जेव्हा कधी मागे वळून पाहण्याची संधी मिळेल तेव्हा ही कॅम्पस लाइफ नक्की आठवेल. तुमच्या प्रत्येक यशामध्ये या संस्थेतील प्राध्यापक, कॅम्पसचं वातावरण आणि इथं मिळालेल्या अनुभवांची आठवण येईल, असं त्यांनी सांगितलं.

IIT दिल्ली सोडताना इथून मिळालेली प्रत्येक गोष्ट एक संपत्ती म्हणून सोबत घेऊन जा आणि ती कधीही विसरू नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेतून बाहेर पडण्यापूर्वी इथल्या प्रत्येक सदस्याची भेट घेऊन जा. IIT दिल्लीसोबतचं हे नातं कायम ताजं ठेवण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

‘जग वेगाने बदलत आहे’

आज विद्यार्थी अशा काळात संस्थेतून बाहेर पडतोय जेव्हा जग खूप वेगाने बदलतंय. जगातील देशांमधील रणनीती आणि समीकरणंही झपाट्याने बदलतायत. या बदलांचा थेट परिणाम कामाच्या पद्धतीवर, व्यवसायांवर आणि करिअरच्या संधींवर होत आहे, असं मोदी यांनी सांगितलं.

या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वेग. आजपासून 20 ते 30 वर्षांनंतर जग नेमकं कसं असेल हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. बदल होत राहणार आहेत आणि प्रत्येक बदलासोबत नवी आव्हानंही येणार आहेत. नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल, व्यवसाय बदलतील आणि संधींचं स्वरूपही बदलत जाईल, असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

PM Modi IIT Delhi
राजकीय घडामोडींना वेग; ६ दिवसांत सुप्रिया सुळेंची मोदी-शहांसोबत दुसरी भेट, नेमकं कारण काय?

‘जो शिकत राहील, तोच जिंकेल’

बदलत्या जगात विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे जो सतत शिकत राहील तोच पुढे जाईल. ‘जो शिकेल, तो जिंकेल’, असा महत्त्वाचा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. नवीन आव्हानांसाठी नवीन उपाय शोधण्याचं धाडस ज्यांच्यात असेल, त्यांच्यासाठी आव्हानं हीच पुढे संधी बनतील. त्यामुळे बदलांना घाबरण्याऐवजी त्यातून नवी संधी शोधण्याचा प्रयत्न करा, असं मोदी म्हणाले.

मोठं आव्हान छोट्या भागांत विभागा- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींकडे पाहण्याचा एक सोपा मार्गही सांगितला. शैक्षणिक पदवी आणि मिळालेले गुण यांचं स्वतःचं महत्त्व आहे. मात्र तुमची पदवी जगाला हे सांगते की, तुम्हाला कठीण समस्यांवर उपाय शोधता येतो, असं ते म्हणाले.

IIT दिल्लीपर्यंतचा तुमचा प्रवास आठवा. इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं आणि इथलं शिक्षणही सोपं नव्हतं. मात्र, तुम्ही हार मानली नाही. ही पदवी एका दिवसात मिळालेली नाही. प्रत्येक विषय, प्रत्येक प्रोजेक्ट, मिड-सेमेस्टर आणि एंड-सेमेस्टर अशा अनेक छोट्या-छोट्या टप्प्यांमधून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. आयुष्यही याच पद्धतीने पुढे जातं. एखादं आव्हान खूप मोठं वाटत असेल तर घाबरून जाऊ नका. त्या मोठ्या आव्हानाचे छोटे-छोटे भाग करा आणि एक-एक टप्पा पार करत पुढे जा, असा सल्ला मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘कॅम्पस लाइफ आणि बाहेरचं आयुष्य वेगळं’

कॅम्पसमधील आयुष्य आणि कॅम्पसबाहेरील आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं, असं मोदी यांनी सांगितलं. IITच्या परीक्षेला अभ्यासक्रम ठरलेला असतो; मात्र, आयुष्याच्या परीक्षेत सगळंच अभ्यासक्रमाबाहेरचं असतं.

कॅम्पस लाइफमध्ये काय शिकायचं, कोणता विषय कधी शिकायचा आणि कोणतं असाइनमेंट पूर्ण करायचं, हे सगळं आधीच ठरलेलं असतं. मात्र, प्रत्यक्ष आयुष्यात परिस्थिती वेगळी असते. तिथे ठरावीक अभ्यासक्रम नसतो आणि कोणतंही असाइनमेंट आधीपासून दिलेलं नसतं, असं त्यांनी सांगितलं

अनेक वेळा तर आपल्यासमोरची खरी समस्या नेमकी काय आहे, हेही कोणी सांगत नाही. त्यामुळे आयुष्यात योग्य प्रश्न ओळखण्याची क्षमता महत्त्वाची आहे, असं मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

‘योग्य प्रश्न ओळखा आणि त्यावर उपाय शोधा’

IITच्या अनेक माजी विद्यार्थ्यांचा प्रवास मी पाहिला आहे. त्यांच्या यशामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी योग्य प्रश्न ओळखले. त्या प्रश्नांना सामोरं जाण्याची तयारी ठेवली आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. समाजातील अनेक अशा समस्या आहेत ज्यांच्याशी लोकांनी परिस्थिती म्हणून तडजोड केली आहे. मात्र काही लोकांनी त्या समस्यांना प्रश्न मानलं आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. अशा विचारातूनच नवे मार्ग आणि नवे उपाय निर्माण होतात, असं मोदी यांनी सांगितलं.

PM Modi IIT Delhi
Breaking News: मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘प्रश्न विचारा, जिज्ञासा जिवंत ठेवा’

विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्या मनातील जिज्ञासा जिवंत ठेवावी आणि शिकण्याची इच्छा कायम ठेवावी, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याबाबत सतर्क आणि जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी आपण कोणताही विचार न करता स्वीकारतो. मात्र अशा गोष्टींचीही तपासणी करा त्यावर प्रश्न विचारा आणि त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त प्रश्न विचारणं पुरेसं नाही तर त्या प्रश्नांचं उत्तर आणि समस्येचा उपाय शोधण्याचं धाडसही ठेवा, असं मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, योग्य प्रश्न विचारण्याची सवय, आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी आणि त्यावर उपाय शोधण्याचं धाडस हीच विद्यार्थ्यांची वेगळी ओळख निर्माण करू शकते, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com