

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी एक अतिशय भीषण बस अपघात झालाय. क्वेटा याठिकाणाहून पेशावरकडे निघालेली प्रवासी बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत कोसळली. हा अपघात डेरा इस्माईल खान जिल्हात घडला असल्याची माहिती आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते. या दुर्घटनेत तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. यावेळी प्राथमिक तपासात बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वेटामधून निघालेली बस खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात पोहोचली होती. हा भाग डोंगराळ असल्याने रस्त्यावर अनेक वळणं आहेत. अशाच एका अवघड वळणावर बसचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट रस्त्यावरून घसरत खोल दरीत कोसळली. दरम्यान अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांचं माध्यम आणि राजकीय विषयांचं सहकारी शाहिद रिंद यांनी सांगितलं की, प्राथमिक अहवालानुसार या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.
त्यांनी पुढे सांगितलं की, दोन्ही प्रांतांतील जिल्हा प्रशासन, बचाव पथकं आणि संबंधित सरकारी यंत्रणा घटनास्थळी मदतकार्य करत असून जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलंय.
1122 बचाव पथकाच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 48 प्रवासी होते. दरम्यान 'डॉन' वृत्तपत्राच्या अहवालानुसार, बस क्वेटामधून निघाली तेव्हा त्यामध्ये 36 प्रवासी होते. त्यानंतर मार्गात विविध ठिकाणी आणखी 12 प्रवासी बसमध्ये चढले होते. शेरानी जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर वली खान काकर यांनी सांगितलं की, मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
या भीषण अपघातानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिलेत. जखमींना शक्य त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.