

Summary -
बिहारमध्ये २१ नोव्हेंबर रोजी महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा होणार आहेत
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा हा नववा हप्ता असणार आहे
आठ हप्त्याचे पैसे आतापर्यंत देण्यात आले आहेत
१.५ कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे
बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. आज नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीश कुमार अनेक योजनांना हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या लाभार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी बिहारमधील महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा होणार आहेत.
२१ नोव्हेंबरला बिहारमधील महिलांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. बिहार निवडणुकीत गेम-चेंजर मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा पुढील हप्ता २१ नोव्हेंबर रोजी हस्तांतरित होणार आहे. या योजनेचे आठ हप्ते आधीच देण्यात आले आहेत. आता नववा हप्ता देण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान बिहार प्रशासनाने स्पष्ट केले होते की महिला रोजगार योजना सुरू राहील आणि ज्या महिलांना निधी मिळाला नाही त्यांना तो नियोजित तारखांना मिळेल.
आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आल्यामुळे ही योजना सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहार सरकारने निवडणुकीपू्र्वीच मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत पैसे देण्याच्या तारखेची घोषणा केली होती. १.५ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. महिला रोजगार योजनेचा फॉर्म भरलेल्या आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यात सरकार आलटून पालटून पैसे पाठवत आहे. २१ नोव्हेंबर रोजी या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. जर तुमच्या खात्यात १० हजार रुपये अजूनही आले नसतील तर ते उद्या येऊ शकतात. तुम्ही ज्याठिकाणी फॉर्म भरला होता त्याठिकाणी जाऊन चेक करू शकता.
बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सरकार आल्यामुळे पुन्हा १.५ कोटींहून अधिक महिलांना आता २ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेची घोषणा करताना बिहार सरकारने सांगितले की, १८ प्रकारचे रोजगार सुरू करण्यासाठी १०,००० रुपयांचा प्रारंभिक हप्ता दिला जाईल. यानंतर यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या महिला सहा महिन्यांनंतर २ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकतात. या योजनेमुळे बिहारमध्ये पुन्हा आपले सरकार आणण्यात नितीश कुमारांना यश आले आहे. एनडीएच्या विजयामध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.