

पराग ढोबळे, प्रतिनिधी, नागपूर
काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केलेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून संविधानाचा आधार घेत संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी संविधान नाकारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचप्रमाणे काँग्रेसचं आंदोलन हे ‘मॅन्युफॅक्चर्ड आंदोलन’ असल्याचं म्हणत त्यांनी या आंदोलनामागील हेतूवरही शंका उपस्थित केली.
नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो, काँग्रेस पार्टीने जे सुरू केलं आहे, ते पूर्णपणे संविधानविरोधी आहे. संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम केलं जात आहे. निवडणूक आयोग, आरबीआय, सीएजी अशा सर्व संस्था कुचकामी असल्याचं दाखवलं जात आहे. लोकांना या संस्थांविरोधात चिथावणी देऊन या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत, असा नरेटिव्ह निर्माण केला जातोय. यांना भारताचं संविधान नाकारून या देशात अति-डावी सत्ता प्रस्थापित करायची आहे.”
“भारताच्या संविधानाला नाकारण्याचं सर्वात मोठं काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने आज केलं आहे. हे म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू. सरन्यायाधीशांनी आमचं ऐकून घ्यावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. मात्र, न्यायाधीशांनी यांना भेटावं आणि यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, असं कोणत्या संविधानात लिहिलं आहे?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालय हे ‘सेपरेशन ऑफ पॉवर्स’च्या तत्त्वानुसार स्वतंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशीही चर्चा करता येत नाही किंवा निवेदन स्वीकारता येत नाही. न्यायालयाचा अधिकार तुम्ही दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचा आहे. मात्र जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
“जे स्वतःला संविधानाचे पाठीराखे म्हणवतात, त्यांनीच सांगावं की सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एखाद्या मोर्चाला सामोरं जाणं हे भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, “सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांशी चर्चा करून यांना सांगितलं आहे की, आम्हाला तुमच्याशी भेटता येणार नाही. तुम्ही याचिका दाखल केली, तर तिची सुनावणी आम्ही घेऊ शकतो. मात्र आता सोशल मीडियावर सरन्यायाधीशांविरोधात शिवीगाळ केली जातेय. एका प्रकारे सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
“हे संविधान नाकारण्याचेच प्रयत्न आहेत. १९७५ मध्ये राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीही संविधानात संशोधन करून मूलभूत अधिकार नाकारले होते आणि त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्गही बंद केला होता. आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष केला आणि संविधान पुन्हा प्रस्थापित केलं,” असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेसला इशारा देताना फडणवीस म्हणाले, “मी यांना इशारा देतो. तुम्ही संविधानाशी खेळ केला आणि संविधानाची प्रत दाखवून कितीही आंदोलन उभं केलं तरी आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावू देणार नाही.”
जंतर-मंतरवर अराजकता सुरू असताना अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने विविध पोस्ट येत होत्या, असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यावेळी संसदीय समितीने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना बोलावून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान पोस्ट बूस्ट करण्यासाठी पैसे मिळत असल्याचं संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी मान्य केलं. हा पैसा परदेशातून आलेला असू शकतो, असंही त्यांनी मान्य केल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
“काँग्रेस सातत्याने हरत असल्यामुळे आणि पुढे जिंकण्याची शक्यता नसल्यामुळे ते धास्तावले आहेत. अनेक राज्यांमध्ये ते अप्रासंगिक झाले आहेत. त्यामुळे ते कसंही करून सत्तेत येऊ पाहत आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली.
तसंच “आमच्या नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या आंदोलनात लोकांना कसं जमवलं जात आहे, हे समोर आणलं आहे. हे मॅन्युफॅक्चर्ड आंदोलन आहे,” असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर शंका उपस्थित केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.