E20 इंधन धोरणाविरोधात दिल्ली टॅक्सी संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली
देशभरातील AITP टॅक्सी चालक, टूर ऑपरेटर्स आणि ट्रान्सपोर्टर्स आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता
सहा प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत
संसद मार्च शांततापूर्ण असेल आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचा संघटनेचा दावा
दिल्लीत गेले ३६ दिवस विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात आवाज उठवला आणि आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांच्या जिद्दीपुढे सरकारला झुकावं लागलं आणि तरुणाईच्या आंदोलनाला यश मिळालं. काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर देशभरातून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने आणखी २ मागण्या सरकारपुढे ठेवल्या आणि त्या मंजूर करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. या आंदोलनानंतर पुन्हा एकदा सरकारसमोर नवं वादळ येऊन ठेपल आहे. E20 विरोधात टॅक्सी युनियनने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या ४ ऑगस्टला मोठं आंदोलन करण्यात येणार आहे.
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी ४ ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली आहे. या आंदोलनात देशभरातील ऑल इंडिया टुरिस्ट परमिट (AITP) असलेले टॅक्सी चालक, टूर ऑपरेटर्स आणि ट्रान्सपोर्टर्स मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत E20 इंधनामुळे वाहनचालकांना अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला.
संघटनेने असा प्रश्नही उपस्थित केला की, ग्राहकांकडून पूर्ण किंमत आकारली जात असताना त्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल का दिले जाते? या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी वाहन उत्पादक, तज्ज्ञ, ग्राहक संघटना आणि वाहनमालक यांचा सहभाग असलेली समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय वाहनांवरील ताशी 80 किलोमीटर वेगमर्यादेबाबतही संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलनाद्वारे संघटनेने E20 धोरणाचा फेरआढावा, पॅनिक बटन आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLTD) प्रणालीची चौकशी, 80 किमी प्रतितास वेगमर्यादेचा पुनर्विचार, स्क्रॅपेज धोरणात सुधारणा, BS-IV डिझेल टुरिस्ट वाहनांवरील निर्बंध शिथिल करणे आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्क कमी करणे अशा सहा प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी होणारा संसद मार्च पूर्णपणे शांततापूर्ण आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी असंबंधित असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.