मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन
नितीन नवीन यांचा विरोधकांना इशारा
इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या गटावर राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा आरोप
देशभरातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यासाठी आज कॉकरोच जनता पार्टी (CJP) आंदोलन करणार आहेत. मात्र अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच अशा प्रयत्नांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. नितीन नवीन यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडीया आघाडी आणि अरविंद केजरीवाल या दोन्ही गटांकडून देशात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि देशातील जागरूक नागरिक अशा प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवीन यांनी म्हटले की, जनतेने निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी विरोधकांकडून देशाच्या शांतीला बाधा पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राजकीय पराभवातून निर्माण झालेल्या निराशेमुळे काही पक्ष अशा भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील नागरिक विरोधकांचे हेतू ओळखतात आणि हेच नागरिक विरोधकांच्या या प्रयत्नांना लोकशाही मार्गाने उत्तर देतील, असेही त्यांनी नमूद केले.भारत जागतिक पातळीवरील विविध संकटांचा सामना करत असतानाही विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची आर्थिक प्रगती, स्वावलंबन आणि राष्ट्रीय सामर्थ्य विरोधकांना मान्य नसल्याचा दावा नवीन यांनी केला. भारताला आत्मनिर्भर आणि सक्षम राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम काही पक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संविधानाचा उल्लेख करून लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणे आणि जनतेचा अनादर करणे योग्य नसल्याचे नवीन यांनी म्हटले. देशाचे नेतृत्व जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे असून लोकशाही प्रक्रियेचा आदर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले. देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय राहतील, असेही त्यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संबंधित विरोधी गटांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशाच्या विकासासाठी आणि शांततापूर्ण वातावरण टिकवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे नवीन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार आणि पक्ष प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.