

आर. श्रीलेखा यांनी नगरसेविका पदाचा राजीनामा दिला
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपचे बहुमत धोक्यात
माजी डीजीपी आर. श्रीलेखा यांच्या राजीनाम्यामुळे राजकारणात खळबळ
श्रीलेखा यांच्या राजीनाम्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये सत्तेचे गणित बदलले
केरळमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. राज्याच्या माजी पोलिस महासंचालक आणि तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणूक जिंकलेल्या नगरसेविका आर. श्रीलेखा यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. श्रीलेखा यांनी महापौर व्ही.व्ही राजेश यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजप सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच पक्षाला राजकीय आव्हानाचा सामना करावा लागल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
श्रीलेखा यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. शनिवारी, आर. श्रीलेखा यांनी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील सास्थामंगलम प्रभागाच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला. महापौर व्ही. व्ही राजेश यांनी श्रीलेखा यांचा राजीनामा मिळाल्याची पुष्टी केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. श्रीलेखा यांनी अद्याप आपला राजीनामा महापालिका सचिवांकडे सादर केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
आर. श्रीलेखा यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत परिषदेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर महापौर व्ही. व्ही. राजेश यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. पण तो अधिकृतपणे महापालिका सचिवांकडे सादर करायचा होता. पालिका निवडणुकीनंतर महापौरपद न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषातून हा राजीनामा देण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आर. श्रीलेखा यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून महापालिका मंडळातील पक्षाचे बहुमत धोक्यात येऊ शकते. औपचारिक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच श्रीलेखा यांनी आपला निर्णय बदलावा आणि राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षाचे नेतृत्व तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेचा आकड्यांचा खेळ
एनडीए: ५० (भाजप ४९ आणि १ अपक्ष)
एलडीएफ: २९ (सीपीआय(एम) २६ आणि सीपीआय(एम) ३)
UDF: २० (काँग्रेस १७, IUML २ आणि RSP १)
इतर: एक अपक्ष आणि एक रिक्त जागा
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एकूण १०१ जागा आहेत. बहुमताचा आकडा ५१ आहे. आर. श्रीलेखा यांच्या राजीनाम्यामुळे एका अपक्ष उमेदवारासह भाजपचा पाठिंबा आता ५० जागांवर आला आहे. भाजपने ५० जागा जिंकल्या होत्या, तर एडीएफने २९ आणि यूडीएफने १९ ते २० जागा जिंकल्या होत्या. आता अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आणखी राजीनामे होतील का? आणि भाजप तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील सत्ता गमावेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.