

भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या युतीबाबत चर्चा अद्याप सुरू आहेत.
युतीच्या तिढ्याच्या केंद्रस्थानी तीन महत्त्वाचे मुद्दे असल्याचे सांगितले जात आहे.
जागावाटपाबाबत चर्चेची एक फेरी पूर्ण झाल्याची माहिती आहे.
भाजप आणि अकाली दल यांच्यातील युतीविषयक चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत; पंजाबमध्ये आता तीन महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत. या चर्चेच्या केंद्रस्थानी भाजपची आक्रमक भूमिका आहे, कारण आतापर्यंत राज्यात बादल यांच्या अकाली दलाच्या तुलनेत भाजपची भूमिका दुय्यम राहिली आहे. जागावाटपाबाबत चर्चेची एक फेरी आधीच पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
पुढील वर्षीच्या सुरुवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षासह (भाजप) विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची दीर्घकाळापासून इच्छा असलेल्या भाजप नवीन आणखी राजकीय डाव खेळणार आहे. अकाली दलसोबत युती अजून तुटली नसून भाजपकडून अजून चर्चा होणार असल्याचं सांगितल जात आहे.
दुसरीकडे भाजप ११७ जागा लढवण्यास इच्छुक आहे. हीच गोष्ट अकाली दल पक्षाला मान्य नाहीये. दरम्यान राज्यात मतदान होण्यास अजूनही सुमारे सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि अकाली दलासोबत चर्चा अजून आपली चालू असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षात तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी माहिती दिलीय.
हे तीन मुद्दे म्हणजे, कोण किती जागा लढवणार आणि त्या जागा कोणत्या असतील? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव पुढे केले जाणार. या सर्व जागेसाठी भाजप आक्रमक आहे. कारण शीख-बहुल असलेल्या या राज्यात आतापर्यंत भाजपने बादल यांच्या अकाली दलाच्या तुलनेत दुय्यम भूमिका बजावलीय. जागावाटपाबाबत चर्चेची एक फेरी आधीच पार पडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
भाजप आधीपेक्षा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. याआधी 'एसएडी' सोबत युती करून लढलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने जास्तीत जास्त २३ जागा लढवल्या होत्या. दरम्यान २०२०-२१ मध्ये कृषी कायद्यांना 'शिरोमणी अकाली दला'ने (SAD) केलेल्या विरोधामुळे युती भाजपसोबतची तुटली होती. त्यानंतर भाजपने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा 'पंजाब लोक काँग्रेस' (PLC) पक्ष आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील 'शिरोमणी अकाली दला'च्या गटाशी युती केली. याअंतर्गत सुमारे ७० उमेदवारांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. त्यात भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील स्वतंत्र कामगिरीच्या आधारावरच भाजप यावेळी अधिक जागांची मागणी करत आहे. त्या निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपला १८.५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. राज्याच्या १३ लोकसभा जागांपैकी एकही जागा त्यांना मिळाली नाही. सत्ताधारी 'आप'ला (AAP) केवळ तीन, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सात, तर अपक्ष उमेदवारांना दोन जागा मिळाल्या. अडचणीत सापडलेल्या 'एसएडी'चे (SAD) नेतृत्व करणारे सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांनी भटिंडा लोकसभा जागा कायम राखली.
मात्र, आकडेवारीनुसार त्या निवडणुकीत भाजप २३ विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर होता. तसेच सहा जागांवर दुसऱ्या आणि १६ जागांवर तिसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजेच या एकूण ४५ विधानसभा मतदारसंघांत भाजप अकाली दलाच्या पुढे होता. भाजपला निवडणुकीसाठी किती जागा मिळाव्यात, यासंदर्भात सध्या चर्चेत असलेल्या आकड्यांपैकी हा एक आकडा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला (SAD) सुमारे १३.४ टक्के मते मिळाली. विधानसभा मतदारसंघांनुसार विचार करता, अकाली दल नऊ जागांवर आघाडीवर होते, तर पाच जागांवर दुसऱ्या आणि आणखी पाच जागांवर तिसऱ्या क्रमांकावर होते.
अकाली दल आणि भाजप यांची युती १९९६ ते २०२० या काळात अस्तित्वात होती. १९९७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचंड विजय मिळवला. यात शिरोमणी अकाली दलाला ७५ आणि भाजपला १८ जागा मिळाल्या. २००७ मध्ये अकाली दलाने ४९ जागा जिंकल्या, तर भाजपच्या जागांची संख्या १९ पर्यंत पोहोचली. त्यानंतर २०१२ मध्ये, सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून या युतीने इतिहास घडवला, यात अकाली दलाला ५६ आणि भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या.
मात्र, सध्या आणखी एक मुद्दा अनिर्णित आहे तो म्हणजे, कोणता पक्ष कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार. साधारणपणे, भाजपने हिंदू-बहुल शहरी भागांत आणि अकाली दलाने शीख लोकसंख्या अधिक असलेल्या ग्रामीण भागांत निवडणुका लढवल्या आहेत. यावेळी मात्र, अकाली दल अशा काही निम-शहरी जागांवरही निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे, जिथे भाजपची स्थिती मजबूत मानली जाते.
निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही न युतीच्या तिढ्यातील एक प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप याबाबत फारसा उत्सुक नाही. मात्र, अकाली दलाची अशी इच्छा आहे की सुखबीर सिंग बादल हेच आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार (चेहरा) असावेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमधील काही नेत्यांना वाटते की सुखबीर यांची प्रतिमा यात अडथळा ठरू शकते. त्यांचे वडील, दिवंगत प्रकाश सिंग बादल, जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा सुखबीर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.