

भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय पाणी ब्रँड असलेली बिस्लेरी कंपनी सध्या चर्चेत आली आहे. बिस्लेरीच्या पाण्याचा नमुना पहिल्या चाचणीत अयशस्वी ठरला आणि पाण्यात रसायने आढळली. आता कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याचा नमुना दुसऱ्या चाचणीत यशस्वी ठरला असून त्यात कोणतीही रसायने आढळून आली नाहीत. पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे. हे बाटलीबंद पाणी अन्न सुरक्षा मानकांचे पालन करते.
बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण त्यांच्या पाण्याचे नमुने जे पूर्वी असुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले होते ते आता एका नवीन चाचमीत अन्न सुरक्षा मानकांनुसार असल्याचे आढळून आले. पण या घटनेनंतर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण कारवाई करत एक आदेश जारी केला आहे. देशातील सर्व ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची चाचणी होणार आहे.
एका सरकारी आदेशानुसार, आता देशभरातील बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या ब्रँड्सची तपासणी केली जाणार आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्यातील वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बिस्लेरी इंटरनॅशनलनेही एक निवेदन जारी करत याबाबत स्पष्टिकरण दिले. त्यांनी सांगितले की, जनतेला सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि सध्याचा वाद मिटवण्यासाठी नियामकाला शक्य त्या सर्व प्रकारे सहकार्य करण्यास कंपनी तयार आहे.
बिस्लेरी इंटरनॅशनलने असा युक्तिवाद केला की, सप्टेंबर २०२५ मध्ये FSSAI ने कंपनीच्या गोवा युनिटमध्ये उत्पादित केलेल्या बाटल्यांच्या एका बॅचमधून ६ नमुने गोळा केले होते. यापैकी ५ नमुने विहित मानकांची पूर्तता करणारे होते पण सहावा नमुना तसा नव्हता आणि त्याऐवजी त्यातील ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेपेक्षा जास्त होती. कंपनीने या निकालाला आव्हान दिले आणि ते नमुने तपासणीसाठी एका संदर्भ प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्या प्रयोगशाळेला पाण्यातील ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत आढळली परंतु पाण्यात पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आढळून आले.
बिस्लेरी कंपनीने सांगितले की, कंपनीने तोच सदोष नमुना दुसऱ्या FSSAI-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासून घेतला होता आणि त्यातही ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत असल्याचे आढळले. प्रयोगशाळेच्या चाचणीचे निकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये FSSAI कडे सादर करण्यात आले होते. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हे प्रकरण बंद झाल्यासारखे आम्हाला वाटले कारण FSSAI ने ना नोटीस पाठवली ना ईमेलला प्रतिसाद दिला. कंपनीचे पिण्याचे पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कंपनी या प्रकरणात FSSAI ला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.