

पनवेल शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. नागरिकांना ३६ तासांच्या पाणीबंदचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) न्हावा-शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. या शटडाऊनचा फटका पनवेल शहरासह सिडकोच्या विविध नोड्स, परिसरातील १४ गावे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि पनवेल रेल्वे स्थानकाला बसणार आहे.
या शटडाऊनदरम्यान वायाळ येथील जलग्रहण वाहिनीमध्ये लोखंडी जाळी बसविणे, साचलेला गाळ काढणे तसेच विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ते रानवारा ढाबा या दरम्यानची जुनी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. लोधिवली येथील गावदेवी मंदिराजवळील जीर्ण जलवाहिनीचीही दुरुस्ती केली जाणार आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांसोबतच १२ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन एमबीआर अंशतः कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच नवीन पनवेलमधील पुष्पधाम येथे जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा बंदचा परिणाम करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली, वारदोली, नांदगाव, कुडावे, दापोली, पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ आणि नानोशी या गावांवर होणार आहे.
याशिवाय नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर आणि सिडकोच्या इतर भागांतील पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता पाणी पुरवठा बंद संपल्यानंतरही नागरिकांना लगेच नियमित दाबाने पाणी मिळणार नाही. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून २० नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. काही भागांत यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.